बिग बॉसच्या बाराव्या सिझनची विजेती ठरली दीपिका कक्कड-इब्राहिम

मुंबई : लाखो लोकांच्या पसंतीचा रिअॅलिटी शो असलेल्या बिग बॉसच्या बाराव्या सीझनच्या विजेत्याची घोषणा झाली आहे. दीपिका कक्कड-इब्राहिम या सिझनची विजेती ठरली आहे. बिग बॉसच्या खास ट्रॉफीसह तिला ३० लाख रुपये बक्षिस मिळालं आहे.

करणवीर, रोमील, दीपक, श्रीसंत आणि दीपिका ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले होते. यापैकी करणवीर आणि त्यानंतर रोमील या शोमधून बाहेर पडले. त्यानंतर दीपक, श्रीसंत आणि दीपिका असे तिघेच उरले होते. 

विजेता नाही, मात्र दीपकनं जिंकले २० लाख-

एक्झीट अमाऊंटची वेळ आली, तेव्हा सलमान खानने त्यांना नियम समजावून सांगितले. तिघांपैकी कुणालाही एक्झिट अमाऊंट घेऊन शोबाहेर पडता येणार होतं. यावेळची एक्झीट अमाऊंट देखील वाढवण्यात आली होती. विजेत्याच्या रकमेपैकी ४० टक्के पैसे एक्झीट घेणाऱ्याला मिळणार होती. बिग बॉसच्या विजेत्याला ५० लाख रुपयांचं बक्षिस मिळतं म्हणजे यापैकी तब्बल २० लाख रुपये एक्झीट घेणाऱ्याला मिळणार होते. वेळ सुरु झाल्यावर बझर दाबायचा होता. अखेर दीपकने एक्झीट अमाऊंट घेऊन खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

दीपकचा निर्णय ठरला योग्य-

दीपकने घेतलेला निर्णय योग्य होता की नाही तेही त्याच वेळी कळालं. सलमान खानने त्याच मंचावर हे जाहीर केलं. दीपकने घेतलेला निर्णय योग्य होता असं सलमाननं सांगितलं. कारण श्रीसंत आणि दीपिकापेक्षा दीपकला कमी मतं मिळाली होती. त्यामुळे काहीही न घेता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्यापेक्षा दीपक २० लाख रुपये घेऊन घराबाहेर पडला.

बहिणीच्या लग्नासाठी वापरणार पैसे-

एक्झीट अमाऊंट घेऊन बिग बॉसबाहेर पडण्याचा दीपकचा निर्णय अगदी योग्य ठरला. बहिणीच्या लग्नाची काळजी असल्याने त्याने हा निर्णय घेतला. नाहीतर मीच विजेता होणार हा आत्मविश्वास त्याला होता. बहिणीचं लग्न समोर दिसत असल्यामुळे मी एक्झीट अमाऊंट घेण्याचा निर्णय घेतला असं त्यानं सांगितलं. खाली हात जाण्यापेक्षा त्याला विजेत्याच्या रकमेतून २० लाख रुपये मिळाले. 

दीपिकाची बाजी, जिंकले ३० लाख रुपये-

दीपकने एक्झीट अमाऊंट घेऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे विजेत्याची रक्कम कमी झाली. ५० लाखांपैकी आता फक्त ३० लाख रुपये उरले होते. श्रीसंत आणि दीपिकापैकी अखेर दीपिकानेच बाजी मारली. श्रीसंतपेक्षा तिला जास्त मतं मिळाली. बिग बॉसची मानाची ट्रॉफी आणि ३० लाख रुपये तिच्या वाट्याला आले. विजेत्याची घोषणा करण्यात आल्यानंतर दीपिकाला यावर विश्वास बसत नव्हता. अखेर तिच्या हातात ट्रॉफी पडल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. 

https://twitter.com/Biggboss12xo/status/1079431183077949443