विरोधी पक्षनेते म्हणून तुमचं काम अधिक खुलतं… अशीच पुस्तकं लिहीत रहा; पटोलेंची फटकेबाजी

मुंबई |  देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईमध्ये पडला. या प्रकाशन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार फटकेबाजी करत उपस्थितांमध्ये हास्याचे स्फोट घडवून आणले.

नाना पटोले म्हणाले-

“मी आणि देवेंद्रजी विदर्भातील आहोत. वेगवेगळ्या पक्षात असलो तरी चांगले मित्र आहोत. म्हणून चांगल्या मित्राचे कौतुक हे केलंच पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे देवेंद्रजींची विरोधी बाकांवर बसून कामगिरी अधिक खुलते, असं माझ्या लक्षात आलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी म्हणून त्यांनी यापुढेही अधिकाधिक काळ काम करावं आणि सन्माननीय सदस्यांना मार्गदर्शन ठरेल अशी नवनवीन ग्रंथसंपदा लिहावी”, अशी कोपरखळी नाना पटोले यांनी फडणवीसांना लगावली.

1999 साली पहिल्यांदा निवडून आल्यावर देवेंद्र फडणवीसांनी तरूण आमदारांसाठी ‘युथ फोरम’ स्थापन केलं होतं. सभागृहात आमदारांचा जास्तीत जास्त सहभाग असावा त्या दृष्टीने त्यांनी आणि ‘युथ फोरम’ने उल्लेखनीय कामगिरी केल्याचं पटोले म्हणाले. तसंच याचदरम्यान त्यांचं ‘अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय?’ हे पुस्तक प्रकाशिक झालं होतं आणि आज त्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होतीये याचा मित्र म्हणून मला मनोमन आनंद होत आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

पुढे बोलताना पटोले म्हणाले-

“खरोखर पुस्तकाच्या नावाप्रमाणे देवेंद्रजींनी क्लिष्ट आणि अवघड समजल्या जाणाऱ्या अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय याचं विश्लेषण अवघ्या 51 पानांत केलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो”.

अजित पवार यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सांगितला फडणवीसांचा ‘तो’ किस्सा-

“राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत होतो. त्यावेळी विरोधी पक्षाचे आमदार सभागृहात जोरदार गोंधळ घालत होते. मात्र यामध्ये भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस अगदी शांतपणे अर्थसंकल्प ऐकत होते. सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन जोरदार घोषणा देत होते. मात्र फडणवीस कानाला एअरफोन लावून आणि बाकड्यावर डोकं ठेऊन अगदी शांतपणे अर्थसंकल्प समजून घेत होते. तसंच टिपणं देखील काढत होते. मला असं वाटायचं की फडणवीसांनी उठावं आणि गोंधळ घालणाऱ्यांना समजून सांगावं की जरा अर्थसंकल्प ऐका म्हणून… पण मुनगंटीवार आणि महाजनांना काय माहिती की या बाबाच्या हाताखालीच आपल्याला पुढे मंत्री म्हणून काम करायचंय….” असं अजित पवार म्हणताच सभागृहात खसखस पिकली.

महत्त्वाच्या बातम्या-

-“गळ्याची आण… फडणवीसांच्या दिल्लीला जाण्याने सगळ्यात जास्त आनंद मुनगंटीवारांना होईल”

-अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना राजकारण सोडण्याचा सल्ला; म्हणाले…

-कोरोनाचा आयपीएलवर परिणाम??; बीसीसीआयने दिली पहिल्यांदाच माहिती

-ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक आणि दिशाभूल; फडणवीसांची टीका

-कोरोना व्हायरस जगाला ‘या’ 4 गोष्टी शिकवणार; आनंद महिंद्रा यांचं ट्वीट