दहा वर्षेच नव्हे तर चाळीस वर्षे राजकीय आरक्षण रहावं- देवेंद्र फडणवीस

मुंबई | आजही राजकीय आरक्षणाला मुदतवाढ देण्याची गरज आहे, कारण अनुसूचित जाती-जमातीतील अनेक जाती अशा आहेत ज्यांच्यापर्यंत अजूनही लाभ पोहोचलेला नाही. त्यामुळे गरज पडल्यास दहा वर्ष नाही तर चाळीस वर्ष लागले तरी मुदतवाढ मिळायला पाहिजे, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

पुढील दहा वर्षांसाठी अनुसूचित जाती-जमातीच्या राजकीय आरक्षणाला केंद्र सरकारने 126 वी घटनादुरुस्ती करुन मुदतवाढ दिली आहे. या विधेयकाला बुधवारी विशेष अधिवेशन घेऊन विधानसभेत मंजुरी देण्यात आली आहे.

आरक्षणाची व्यवस्था नोकरी, शिक्षणापुरती नाही तर विषमतामुक्त समाज निर्माण करण्यासाठी उभी करण्यात आली आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगात ज्यांना समतापूर्ण समाज निर्माण करायचा त्या सर्व देशात वेगवेगळ्या पद्धतीने आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, ज्या समाजाला लोकशाहीच्या मंदिरात येण्याची संधी मिळत नाही त्यांच्यासाठी राजकीय आरक्षण आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनादरम्यान म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-