महाराष्ट्र Top news मुंबई

अमित शहांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Devendra Fadnavis 1
Photo Credit- Twitter/ Devendra Fadnavis

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहेत. आज त्यांनी भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे नेते बीएल संतोष आणि सीटी रवी यांची भाजप मुख्यालयात भेट घेतली.

या नेत्यांमध्ये सुमारे चार ते पाच तास चर्चा झाली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना फडणवीस यांनी ही माहिती दिली. माझ्या दिल्लीवारीनंतर कुठल्या राजकीय चर्चेला उधाण आलं याची मला कल्पना नाही, असं फडणवीस म्हणाले.

मी इथे संघटनात्मक बैठकीसाठी आलो होतो. चंद्रकांतदादा आणि मी सीटी रवी तसेच बीएल संतोष यांच्याशी चर्चा केली. संघटनेची पुढची वाटचाल आणि त्याचा आढावा यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. तब्बल चार ते पाच तास ही बैठक चालली. या बैठकीत वेगळा काही अजेंडा नव्हता, असं ते म्हणाले.

अमित शहा आमचे नेते आहेत. दिल्लीत आल्यावर त्यांची भेट घेतोच. त्यांच्याशीही चर्चा झाली. पक्षात कोणताही संघटनात्मक बदल होणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नागपूरमध्ये कुठला चमत्कार घडवतील असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. पण, असं काहीही तिथे घडणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे हे चांगल्या मतांनी निवडून येतील, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोला लगावला.

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मार्चमध्ये सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. त्याबाबत फडणवीस यांना विचारण्यात आलं असता मला त्याची माहिती नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांना भाजपच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती दिली. त्यांचं मार्गदर्शन घेतलं. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्त्वाच्या विषयांबाबतही चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांना माहिती दिली. राज्यातील सद्यस्थितीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, अशी माहिती देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मॉर्निंग वॉकसाठी टेरेसवर गेला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; कोल्हापूरमधील घटनेनं खळबळ 

अण्णा हजारेंची तब्येत बिघडली, पुण्यातील रुग्णालयात दाखल 

पुण्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद?, ‘या’ नेत्याचं नाव चर्चेत 

“मोदींनी एकदा दाढी हलवल्यावर 50 लाख घरं पडतात, अन् दुसऱ्यांदा हलवली की…” 

“राष्ट्रवादीचे काही नेते माझ्या पराभवाला जबाबदार”