देवेंद्र फडणवीस आज राज ठाकरेंची भेट घेणार, ‘या’ मुद्द्यांवर महत्त्वाची चर्चा होणार?

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राजकारणात चांगलीच उलथापालथ झाली.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेत बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. महाराष्ट्रातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकार कोसळलं व नवं शिंदे सरकार सत्तेत आलं.

महाराष्ट्रातील या सत्तानाट्यात अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत होत्या. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया पार पडल्याने राज ठाकरेंची भूमिका समोर आली नाही.

अनेक राजकीय घडामोडी घडत असताना राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज ठाकरेंची भेट घेणार आहे. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे व फडणवीसांची भेट नियोजीत होती मात्र मुंबईतील पाऊस व फडणवीस पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर गेल्याने ही भेट पुढे ढकलण्यात आली होती.

देवेंद्र फडणवीस आज 11 वाजता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेऊ शकतात. यावेळी फडणवीस राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करतील.

फडणवीस-ठाकरेंच्या भेटीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. सध्याची राजकीय स्थिती व आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीविषयी देखील या दोन नेत्यांमध्ये महत्त्वपू्र्ण चर्चेची शक्यता आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरेंनी अभिनंदनपर पत्र लिहित फडणवीसांचं कौतुक केलं होतं. तर फडणवीसांनीही विधानसभेत आवर्जून या पत्राचा उल्लेख केला होता. त्यामुळे या भेटीनंतर नवीन राजकीय समीकरण दिसणार का? अशा चर्चा आता रंगत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात पावसाचा जोर ओसरणार मात्र दोन दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

शरद पवारांनी शिवसेना फोडली म्हणणाऱ्या केसरकरांना अजित पवारांचा प्रेमाचा सल्ला, म्हणाले…

अभिनेत्री सुष्मिता सेनने ललित मोदीसोबत संसार थाटला?, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

“165 आमदारांचं पाठबळ तरी, दोघंच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक झालेत”

मोठी बातमी! अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ