खेळ

बॉस धोनी ‘धोनी’ है; विराट कोहलीलाही ते जमलं नाही…

अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर विराट कोहलीच्या भारतीय संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवणं खूपच महत्त्वाचं होऊन बसलं होतं. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली जाणारी ही मालिका फक्त तीन सामन्यांची आहे. दुसरा सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला असता तर मालिका खिशात घालण्यात त्यांना यश आलं असतं. भारतीय संघाने त्यामुळेच डोंगराएवढं आव्हान असतानाही या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. या विजयाचे खरे शिल्पकार ठरले कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, मात्र खरा भाव धोनीच खावून गेला.

कर्णधार विराट कोहलीनं शतक करत विजयाचा पाया रचला. मात्र तो शेवटपर्यंत टिकू शकला नाही. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अर्धशतक तर केलंच मात्र शेवटपर्यंत म्हणजेच भारतीय संघ सामना जिंकेपर्यंत त्याने किल्ला चढवला. फक्त याच गोष्टीमुळे तो या सामन्यात उजवा ठरला नाही तर एक आणखीही कारण आहे ज्यामुळे धोनीच कोहलीपेक्षा उजवा असल्याचं समोर आलं. हे कोणी सांगितलं नाही तर आकडेच सगळं काही सांगत आहेत.

एकदिवसीय सामन्यांमध्ये या दोघांची धावांचा यशस्वी पाठलाग करतानाची सरासरी ही 99 पेक्षाही अधिक झाली आहे. यात महेंद्रसिंग धोनीची सरासरी ही 99.85 आहे, तर विराट कोहलीची सरासरी 99.04 अशी आहे. अर्थातच कोहलीपेक्षा धोनीची सरासरी अधिक असून या विभागात त्याने कोहलीला मागं टाकलं आहे. 

एवढंच नव्हे तर एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक सरासरी असणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये (कमीतकमी 25 डाव खेळलेल्या) हे दोघे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. म्हणजेच धोनी पहिल्या तर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर…

धोनीने आजच्या सामन्यात 54 चेंडूत 101.85 च्या सरासरीने नाबाद 55 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 2 षटकार मारले आहेत. तर विराट कोहलीने 112 चेंडूत 104 धावांची शतकी खेळी केली आहे. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.

या दोघांनी मिळून या सामन्यात चौथ्या विकेटसाठी 82 धावांची अत्यंत महत्त्वपूर्ण अर्धशतकी भागीदारीही केली आहे. या भागिदारीमुळेच भारताला विजय मिळणं शक्य झालं. यामध्ये विराट कोहली भारताला विजय मिळण्याआधीच बाद झाला, मात्र महेंद्रसिंग धोनी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवर नांगर ठोकून होता. त्याने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. 

वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक सरासरी असणारे क्रिकेटपटू (कमीतकमी 25 डाव खेळले क्रिकेटपटू)-

99.85 – एमएस धोनी

99.04 – विराट कोहली

86.25 – मायकल बेवन

82.77 – एबी डिविलियर्स

77.80 – जो रुट

IMPIMP