खेळ

आजच्या मॅचपेक्षा धोनीच्या या कॅचची सर्वाधिक चर्चा

भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टनकूल महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीवर अलिकडच्या काळात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मात्र असं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना धोनीची कामगिरी आणखी उजळताना दिसते. पुण्याच्या एकदिवसीय सामन्यात धोनीच्या उपयुक्ततेची प्रचिती पुन्हा एकदा आली. या सामन्यात धोनीनं घेतलेला कॅच इतका जबरदस्त होता की धोनी काय चीज आहे यानिमित्ताने पुन्हा पहायला मिळालं. धोनीच्या चाहत्यांसाठी तर हा एक अविस्मरणीय कॅच असेल. 

नाणेफेक जिंकलेल्या कर्णधार विराट कोहलीनं वेस्ट इंडिजला पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं. वेस्ट इंडिजचे सलामीवीर कीरन पॉवेल आणि सी हेमराज यांनी सावध सुरुवात केली. 5 व्या षटकाच्या समाप्तीनंतर वेस्ट इंडिजच्या धावफलकावर 25 धावा लागल्या होत्या. कोहलीनं सहाव्या षटकासाठी चेंडू जसप्रीत बुमराच्या हाती सोपवला. सहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर हेमराजला पूलशॉट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. चेंडू उंच हवेत उडाला. यष्टीरक्षक असलेल्या धोनीनं चेंडूकडे धाव घेतली. चेंडू टप्प्यात येण्याआधी खाली कोसळणार असं दिसताच धोनीनं अंग खेळपट्टीवर सोडून दिलं. धोनीनं मारलेला डाय आणि त्याच्या हातात आलेला चेंडू, धोनीच्या चाहत्यांसाठीच नव्हे तर सर्वच क्रिकेटप्रेमी भारतीयांसाठी हा क्षण जल्लोष करायला लावणारा होता. 

पाहा तो जबरदस्त कॅच-

https://twitter.com/puneet44567/status/1056105112190431232

स्लो मोशनमध्ये नक्की पाहा-

महेंद्रसिंग धोनीनं घेतलेला कॅच पुण्याच्या स्टेडिअमवर तसेच टेलिव्हिजनवर आजची मॅच पाहणाऱ्या भारतीय प्रेक्षकांना जल्लोष करण्याची संधी देणारा पहिला क्षण होता. कॅच घेण्याच्या नादात धोनी मैदानात कोसळला मात्र त्याने हातातील चेंडू खाली पडू दिला नाही. धोनीच्या चाहत्यांसाठी हे एखाद्या जादूगाराने जादू करण्यापेक्षा कमी नव्हतं. 

37 वर्षीय महेंद्रसिंग धोनीचं वय हे फक्त आकडे असून त्याचा त्याच्या कामगिरीवर काहीही फरक पडत नाही, असं अनेकांचं म्हणणं आहे. सोशल मीडियाच्या धोनीच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून हा सर्वोत्तम कॅच असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. प्रतिक्रियांचा पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये. आजच्या मॅचपेक्षा या कॅचची चर्चा सर्वाधिक झाल्यास नवल वाटू देऊ नका.