खेळ

“संघ निवडताना अक्कल काय गहाण ठेवली होती का???”

Virat And Dilip Vengsarkar

नवी दिल्ली |  विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असणाऱ्या भारतीय संघाला बुधवारी झालेल्या सेमी फायनलच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागला. अन् करोडो फॅन्सचा हिरमोड झाला. काही भारतीय पाठीराखे संघाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले तर काही पाठीराख्यांनी चुकांवर बोट ठेवलं. निवड समितीचे माजी प्रमुख दिलीप वेंगसरकर यांनी भारताच्या निवड समितीला पराभवाबद्दल जबाबदार धरलं आहे.

दिलीप वेंगसरकर यांनी न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाची निवड चुकली, असं म्हणत एम.एस. के प्रसाद यांच्या निवड समितीला धारेवर धरलं आहे.

संघाची निवड करताना कसलाही विचार केला गेला नाही, असं माझं मत आहे. संघ निवडताना अक्कल काय गहाण ठेवली होती का?, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

संघ निवडताना तुमच्याकडे प्लॅन A आणि प्लॅन B असणे गरजेचे आहे. 3-3 विकेटकिपर्सना घेऊन खेळण्यात काय अर्थ आहे?? असंही वेंगसरकर यांनी म्हटलं आहे.

निवड समिती जर चांगले फलंदाज आणि चांगले खेळाडू निवडू शकत नसेल तर स्थानिक क्रिकेट स्पर्धांचा फायदा काय?? देशभरात लाखो खेळाडू खेळत आहेत. वनडे क्रिकेटमध्ये तुम्हाला 5 फलंदाज निवडता येत नसतील तर मग कठीण आहे… अशा शब्दात वेंगसरकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, अनेक भारतीय चाहत्यांनीसुद्धा वेंगसरकर यांच्याच पावलावर पाऊल टाकत संघ निवडीवर आपला आक्षेप नोंदवला आहे.