किम जोंगची तब्येत धडधाकट… ट्रम्प म्हणतात, मला आता यावर काहीच बोलायचं नाही!

नवी दिल्ली |  किम जोंग यांची प्रकृती कशी आहे हे मला माहिती आहे पण मी सांगणार नाही, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील 15 दिवसाखाली म्हटलं होतं. आता किम जोंग तब्बल 20 दिवसानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्यानंतर ट्रम्प यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. मला किम यांच्यावर आता काहीच बोलायचं नाही, असं ते म्हणाले आहेत.

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनच्या मृत्यूबाबत काही दिवसांपूर्वी अफवा पसरल्या होत्या. अगदी त्याचा ब्रेन निकामी झाल्याची देखील चर्चा पसरली होती. परंतू किमची तब्येत धडधाकट असल्याची माहिती आता समोर आली आहे.

उत्तर कोरियाची सरकारी वृत्तसंस्था KCNA ने याबद्दल वृत्त प्रकाशित केलं आहे. तब्बल 20 दिवसांनंतर किम यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. एका रासायनिक खतांच्या कारखान्याच्या उद्घाटनाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थित लोकांनी किम यांच्या नावाचा जयघोष करत त्यांचं स्वागत केलं.

दरम्यान, अमेरिकेतील काही माध्यमांनी किमवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो मृत्यूच्या दारात उभा आहे, अशा बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनाही किम बऱ्याच दिवसांपासून दिसले नाहीत, असं वक्तव्य अमेरिकेचे संरक्षणमंत्री माईक यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर किमबाबात वाईट घटना घडली असावी, असा अंदाज बऱ्याच जणांनी लावला होता.