देश

खरंच हवा फिरली?; भाजपचा प्रचार करणारे डुप्लिकेट मोदीसुद्धा आता काँग्रेस सोबत!

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या फेसबुक पोस्टची सध्या जोरदार चर्चा आहे. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी दोन फोटो टाकले आहेत. या फोटोंना त्यांनी “पाहा छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा प्रचार करताना मला कोण सापडलं” असं कॅप्शन दिलं आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकजण या पोस्टवर कमेंट करत आहेत तर कित्येक जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे. कुणी नरेंद्र मोदींच्या बाजूने तर कुणी राहुल गांधींच्या बाजूने या पोस्टवर व्यक्त होत आहे. अनेकांनी तर राहुल गांधी यांची चक्क खिल्ली उडवली आहे. असं असलं तरी सोशल मीडियावर सध्या गाजत असलेल्या पोस्टपैकी ही एक पोस्ट आहे. 

नक्की काय आहे राहुल गांधींच्या या पोस्टमध्ये?

राहुल गांधी सध्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे प्रचाराला वेग आला आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये येथे प्रमुख लढत असल्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते प्रचारसभा आणि बैठकांवर जोर देत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा सभा घेण्याचा धडाका लावला आहे. अशाच एका सभेनंतर त्यांना एक व्यक्ती भेटायला आली. अभिनंदन पाठक असं या व्यक्तीचं नाव आहे, मात्र 2014 नंतर त्यांना अभिनंदन म्हणून कुणी फारसं ओळखत नाही. त्यांची ओळख बनलीय डुप्लीकेट मोदी… 

अभिनंदन पाठक यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. ते सध्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा प्रचार करत आहे. काँग्रेसची सत्ता यावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी ते भाजपविरोधात मैदानात उतरले आहेत. दिसायला हुबेहुब नरेंद्र मोदींसारखे असले तरी त्यांनी मोदींच्या विरोधी पक्षाला अर्थात काँग्रेसला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधीसोबत भेट होताच राहुल यांनी त्यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

डुप्लिकेट मोदी करत होते भाजपचा प्रचार-

2014 च्या लोकसभा निवडणुकीत अभिनंदन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी प्रचार केला होता. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी भाजपच्या अनेक सभांना हजेरी लावली होती. लोक त्यांनी मोदीजी मोदीजी म्हणत, त्यांच्यासोबत सेल्फी काढत. अनेक उमेदवारांनी तर त्यांना प्रचाराला देखील बोलावले होते. अभिनंदन भाजप उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी जात. यामुळे त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

अभिनंदन यांचा 2014 च्या प्रचारातील व्हीडिओ-

म्हणून सोडली भाजपची साथ-

2014 च्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. भाजपने दिलेली आश्वासनं पाळली जातील. भारतीय जनतेला अच्छे दिन पाहता येतील, अशी अभिनंदन पाठक यांची धारणा होती. मात्र त्यांची ही धारणा सपशेल चुकीची ठरली. 4 वर्षे उलटले मात्र अच्छे दिन काही आले नाही. अभिनंदन पाठक यांचा भ्रमनिरास झाला त्यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रसची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ते काँग्रेसचा प्रचार करत आहेत. देशात काँग्रेसची सत्ता यावी, अशी त्यांची इच्छा आहे.