“एकनाथ खडसे तेव्हा आम्हाला शिव्या घालत होते” – शरद पवार

उस्मानाबाद | अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. नुकतंच भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरानंतर भारतीय जनता पार्टीला मोठं भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकनाथ खडसे यांनी आज भाजप पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खडसे यांनी अद्याप अधिकृतपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला नसला तरी राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना खडसे यांच्या पक्षांतराविषयी कालच संकेत दिले होते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर होते. दौऱ्यानंतर काल त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी खडसेंच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं.

एकनाथ खडसे यांचं कर्तृत्व, काम आणि खानदेशातील त्यांचे नेतृत्व याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. तसेच भाजपच्या उभारणीत खडसे यांचं मोलाचं योगदान आहे. एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते होते, अर्थमंत्री होते तेव्हा ते आम्हाला शिव्या घालत होते. मात्र, विरोधकांच्या बाजूने ते प्रखरतेने दिसत होते, असं पवार यांनी म्हटलं होतं.

तसेच एकनाथ खडसे यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. जिथं खडसे यांच्या कर्तृत्वाची नोंद घेतली जाईल तेथे ते प्रवेश करतील. एखाद्या पक्षाबद्दल त्यांना विश्वास वाटत असेल तर त्याला आम्ही काय करू शकतो, असंही शरद पवार यांनी काल म्हटलं होतं.

मात्र, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी आज लगेचच खडसे यांच्या पक्षप्रवेशाविषयी माहिती दिली आहे. खडसे यांच्या पक्षप्रवेशाविषयी पाटील आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

एकनाथ खडसे हे गेल्या कित्येक दशकांपासून भाजपचे नेतृत्व करणारे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबर देखील पक्षाचं काम केलं आहे. त्यांच्यावर पक्षात अन्याय झाला आहे. यामुळे ते आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. खडसे यांच्या प्रवेशाची बातमी आमच्यासाठी सुखद आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच जयंत पाटील यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाचा मुहूर्त देखील सांगितला आहे. एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांच्याबरोबर आणखीही काही नेते राष्ट्रवादीत येण्यासाठी उत्सुक आहेत. भाजपचे काही आमदार खडसे यांच्या संपर्कात आहेत. मात्र, कोरोना महामारीमुळे पुन्हा निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे टप्प्या टप्प्याने इतर नेत्यांचा पक्षप्रवेश होईल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सामन्यात पराभव पत्कारूनही धोनीनं विरोधी टीमच्या खेळाडूला दिलं ‘हे’ गिफ्ट; वाचा काय आहे यामागील कारण

भाजपला आणखी मोठा धक्का! खडसेंनंतर आता भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याही राष्ट्रवादीत जाणार

काय सांगता! बिस्किटांची चव ओळखण्यासाठी ‘ही’ कंपनी देतेय तब्बल 40 लाख रुपये

माणसातील माणुसकी ओळखण्यासाठी ‘या’ 9 गोष्टी ठरतील खूप उपयुक्त! नक्की वाचा

‘…तर मी एका मिनिटात राजकारण सोडेल’; राष्ट्रवादी प्रवेशापूर्वीच खडसेंच्या राजकारण सोडण्याच्या वक्तव्यानं समर्थक हैराण!