Top news खेळ देश

बाप मजूर, आई चालवते दुकान; खेळायला मिळत नव्हता साधा बॉल, बनला याॅर्कर किंग!

नवी दिल्ली | २०२० च्या आयपीएल मोसमात युवा खेळाडू आपली प्रतिभा दाखवत आहे. काही खेळाडू अजून आपला खेळ दाखवण्यास उत्सुक आहे. सध्या थांगरासू नटराजन या युवा खेळाडूने ‘यॉर्कर किंग’ म्हणून आयपीएलमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. नटराजन यांनी स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे, त्यामागे खूपच संघर्षमयी प्रवास आहे. त्यांचा आयपीएलपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर आणि कठीण होता. नटराजन यांनी सातत्य आणि कठोर मेहनतीतुन हा प्रवास साध्य केला आहे, त्याविषयी आपण जाणून घेऊ…

नटराजन यांचा जन्म २८ मे १९९१ रोजी तामिळनाडूमधील सलेम जिल्ह्यातील चिन्नप्पमपट्टी गावातील अतिशय गरीब कुटुंबात झाला. नटराजन यांचे लहानपण खूपच गरिबीत गेले. त्यांची गरिबी एवढी होती की, त्यांना शाळेच्या अभ्यासासाठी जुनी पुस्तके घ्यावी लागली. तसेच कुणाचेही जुनी कपडे घालून ते शाळेत जायचे. शाळेच्या दिवसात नटराजन यांना खेळाची आवड नव्हती.

पण जेव्हा त्यांना क्रिकेट खेळाविषयी माहिती झाली तेव्हा त्यांची ती आवड बनली. नटराजन यांच्याकडे क्रिकेट खेळण्याचे साधन उपलब्ध नव्हते. क्रिकेट किट लांबच राहिले त्यांच्याजवळ साधा एक एक चेंडूही नव्हता. तेव्हा नटराजन यांच्यासाठी मैदान ही खूपच नवीन गोष्ट होती. मग त्यानंतर त्यांच्या जीवनात प्रशिक्षक जयप्रकाश यांचा प्रवेश झाला. नटराजन यांच्या जीवनात यांचे खूपच मोठे योगदान आहे. त्यानंतर त्यांच्या मदतीने नटराजन चेन्नईला क्रिकेटचे बारकावे शिकण्यासाठी गेले.

एकीकडे कुटुंबाची जबाबदारी आणि दुसरीकडे नटराजन यांचे स्वप्न हळूहळू उभारी घेत होते. २०१०-११ मध्ये प्रथमच नटराजन यांना टीएनसीए लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर २०१२-१३ मध्ये त्यांना ‘जॉली रोवर्स’ सारख्या मोठ्या अकादमीकडून नटराजन यांना खेळण्याची संधी प्राप्त झाली. ही तीच अकादमी आहे, जिथून भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज गोलंदाज आर.अश्विन आणि शानदार फलंदाज मुरली विजय यांनी प्रशिक्षण घेतले होते.

इथूनच त्यांचे जीवन पूर्णपणे बदलले होते. नटराजन हे क्रिकेटचे सर्व बारकावे शिकून आपला खेळ सुधारण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. या अकादमीमध्ये सलग दोन वर्ष गोलंदाजी केली, त्यानंतर त्यांना २०१५ मधील रणजीमध्ये खेळण्याची संधी भेटली. नटराजन यांनी प्रशिक्षणाच्या सरावात यॉर्कर चेंडू टाकण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती. त्यांच्या या यॉर्कर चेंडू टाकण्यामुळे त्यांना तामिळनाडूचा ‘मुस्तफिजूर रहमान’ म्हणू लागले.

त्यानंतर २०१६ मध्ये तामिळनाडू प्रीमियर लीग (टीपीएल) यामध्ये नटराजन हे डिंडीगुल ड्रॅगन्सकडून खेळले, यातील त्यांचा खेळ खूपच शानदार होता. आपल्या या विशेष गोलंदाजीमुळे नटराजन यांनी आयपीएलच्या विविध संघाचे लक्ष आपल्याकडे वळवले. २०१७ मधील आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नटराजन यांना १० लाखांमध्ये घेण्याचे ठरवले पण संघाने नंतर त्यांची बोली थेट ३० पटीने वाढवून ३ कोटीमध्ये त्यांना विकत घेतले.

त्यावेळी संघावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. तेव्हा नटराजन यांचा टी-२० मध्ये काही खास विक्रम नव्हता, फक्त पाच सामन्यात ४ बळी घेतले होते. पण नटराजन यांनी तामिळनाडूतील ९ रणजी सामन्यांमध्ये २४ बळी घेतले होते. त्यानंतर २०१८ मध्ये नटराजन हे सनरायजर्स हैदराबाद संघाचा हिस्सा बनले. पण त्यांना मागील दोन मोसमात खेळण्याची संधी मिळाली नाही. आता आयपीएल २०२० मध्ये नटराजन सनरायजर्स हैदराबादकडून खेळत आहे.

आतापर्यंत त्यांनी ३ सामन्यामध्ये तीन बळी घेतले आहे. यातच नटराजन यांनी एकापेक्षा एक सरस यॉर्कर चेंडूने जगातील प्रसिद्ध फलंदाजांना अडचणीत टाकलं आहे. नटराजन यांचा संघर्षमयी प्रवासाचा आदर्श गावातील तरुणांनी घेतला आहे, तसेच अनेक तरुण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

वडील चर्मकार, आई करते मजुरी; मराठी मुलानं उभारलं असं साम्राज्य, आता करोडोची उलाढाल!

आई-वडिलांनी भाजीपाला विकून शिकवलं, पोरीनं साऱ्या राज्यात त्यांचं नाव करुन दाखवलं!

सोशल मीडियावरील एका व्हिडीओचा चमत्कार; रडणारा बाबा हसू लागला!

बेअरस्टोचं शतक हुकलं, मात्र केलाय असा पराक्रम ज्यात डेविड वॉर्नरही सहभागी!

निकोलस पूरनने यंदाच्या आयपीएलमध्ये केलाय असा पराक्रम, जो कुणालाही जमला नाही!