चित्रपगृहांमध्ये 5 रुपयांचे पॉपकॉनर्न 250 रुपयांना का?; न्यायालयानं खडसावलं!

मुंबई : चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ एवढे महाग का भेटतात? राज्य सरकारचे या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण नाही का? 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला?, असे सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारले आहेत. 

चित्रपटगृहांमध्ये चढ्या दरानं खाद्यपदार्थ विकले जातात. धक्कादायक बाब म्हणजे बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यासही चित्रपटगृहांमध्ये बंदी असते. त्यामुळे चित्रपट पहायला जाणाऱ्यांना चित्रपटगृहातीलच पदार्थ घेऊन खावे लागतात. चित्रपटगृहांमध्ये अव्वाच्या सव्वा दराने सगळे खाद्यपदार्थ विकले जातात. 

चित्रपटगृहांमधील खाद्यपदार्थांच्या याच चढ्या दराविरोधात जैनेंद्र बक्षी यांनी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. चित्रपटगृहांमध्ये बाहेरील पदार्थ नेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. यावर सुनावणी करताना न्यायाधीशांनी राज्य सरकारला फैलावर घेतलं. 

सुरक्षेच्या कारणास्तर खाद्यपदार्थांना बंदी असेल तर ही बंदी सरसकट लागू व्हायला हवी. चित्रपटगृहाच्या आतही खाद्यपदार्थ विकण्यावर निर्बंध घालायला हवेत, असं न्यायालयानं म्हटलंय. याप्रकरणी न्यायालयाने राज्य सरकारला 4 आठवड्यामध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.