अखेर एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यानं दिली माहिती

पुणे | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. अनेक राजकीय नेते येत्या काळात पक्षांतर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेही राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू होत्या. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशातच आता खडसेंच्या पक्षांतराविषयी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

एकनाथ खडसे हे गेल्या कित्येक दशकांपासून भाजपचे नेतृत्व करणारे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबर देखील पक्षाचं काम केलं आहे. त्यांच्यावर पक्षात अन्याय झाला आहे. यामुळे ते आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. खडसे यांच्या प्रवेशाची बातमी आमच्यासाठी सुखद आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच जयंत पाटील यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाचा मुहूर्त देखील सांगितला आहे. एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांच्याबरोबर आणखीही काही नेते राष्ट्रवादीत येण्यासाठी उत्सुक आहेत. भाजपचे काही आमदार खडसे यांच्या संपर्कात आहेत. मात्र, कोरोना महामारीमुळे पुन्हा निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे टप्प्या टप्प्याने इतर नेत्यांचा पक्षप्रवेश होईल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकीकडे खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा चालू असतानाच दुसरीकडे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्याला साफ नकार दिला होता.

एकनाथ खडसे भाजप पक्ष सोडून कोठेही जाणार नाहीत, असं पाटील यांनी काल सांगितलं होतं. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं होतं. एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावर पाटील काल पत्रकार परिषदेत बोलत होते.

नाथाभाऊ कोठेही जाणार नाहीत. भारतीय जनता पार्टीचे ते अतिशय जेष्ठ नेते आहेत. नाथाभाऊ आमचे मार्गदर्शक देखील आहेत. यामुळे सर्वांचा हिरमोड होईल भारतीय जनता पार्टीचं नुकसान होईल अशी कोणतीही गोष्ट ते करणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र, आता राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची अधिकृत माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला मोठा धक्का! पक्षांतरापूर्वीच खडसेंनी मोदींविरुध्द टाकलं पहिलं पाऊल

सुशांत प्रकरणी डाव फिरला! आता एनसीबी विरोधातच ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल

पंकजा मुंडेंना पाहून का रडत आहेत ‘हे’ आजोबा? वाचा सविस्तर

अखेर खडसेंचं राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं ठरलं! सर्व समर्थकांना ‘या’ मुहूर्तावर मुंबईत येण्याच्या सूचना?

नाथाभाऊंची राष्ट्रवादी प्रवेशाची ती वार्ता चुकीची, ते भाजपमध्येच राहतील?