वनअधिकारी दीपाली चव्हाण यांची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये केले धक्कादायक आरोप

अमरावती| अमरावती जिल्ह्यातील मेळघाट डिजिटल व्हिलेज हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. उप वन संरक्षक विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे.

दीपाली अतिशय डॅशिंग अधिकारी होत्या. त्यांनी आत्महत्या केली हे अनेक अधिकारी अजूनही मानायला तयार नाहीत. त्यांची हत्या झाल्याचा सूर वनविभागात आहे. मूळच्या सातारच्या असणाऱ्या दीपाली चव्हाण यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र वन सेवा 2014 परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.

जिथे माणसं कामं करायला घाबरतात तिथे ही तरूण अधिकारी आपली कर्तव्याची छाप उमटवत होती. त्यांच्या कामाची सर्वत्र चर्चा होती. रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडले होते. त्यातून त्यांची ओळख “लेडी सिंघम” अशी झाली होती.

दीपाली चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अपर प्रमुख प्रधान संरक्षक रेड्डी यांना ही सुसाईड नोट लिहिली आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये विभागीय वन अधिकारी विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. विनोद शिवकुमार यांनी मला वारंवार निलंबित करण्याची आणि चार्जशीट दाखल करण्याची धमकी दिली होती तसेच मला शिव्या देखील दिल्या. त्यांनी नेहमी मला नियम बाह्य काम करण्यास भाग पाडलं, असा आरोप दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.

यापूर्वी शिवकुमार रेड्डी यांच्याकडे तक्रार केली, मात्र त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचं उल्लेखही या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.

दीपाली चव्हाण यांना शिवकुमार यांनी ट्रेकला बोलावले होते. आपण गर्भवती असल्याने ट्रेक करु शकत नव्हती, तरी मुद्दामहून तीन दिवस मालूरच्या  कच्च्या रस्त्याने फिरविले. यामुळे आपला गर्भपात झाल्याचा गंभीर आरोप देखील या नोटमध्ये महिला अधिकाऱ्याकडून करण्यात आला.

काम केल्यानंतरही अनेक बिल काढली नसल्याचा देखील उल्लेख त्यांनी केला. या आत्महत्येमुळे वन विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. आता वरिष्ठ अधिकारी यावर काय निर्णय घेतात. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाते का, याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, पत्रात दीपालीने ज्या अधिकाऱ्यावर ठपका ठेवला ते उपवनसंरक्षक शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावर आज अटक करण्यात आली. तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी नॉट रीचेबल आहेत.

 

महत्वाच्या बातम्या – 

“यूपीएचा विषय केंद्रातला, जिल्हास्तरावरील लोकांनी यावर…

‘बोल्ड सीन देण्यास माझा नकार नाही पण….’…

“सोनाराने कान टोचले तर दुखत नाही, बरं झालं…

‘या’ अभिनेत्रीच्या “बिंदी आणि बिकनी” फोटोचा सोशल…

‘आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे’;…