‘गणपती बाप्पा मोरया’ म्हटल्यामुळे MIMच्या आमदाराने मुस्लिमांची मागितली माफी

मुंबई : गणपती बाप्पा मोरया म्हटल्यामुळे एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी चक्क मुस्लीम समाजाची माफी मागितली आहे. त्यांच्या माफीनाम्याचा व्हीडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून वारीस पठाण यांच्यावर माफी मागण्यासाठी दबाव आणला गेला का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. 23 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला होता. गणपती मंडळात बोलताना वारिस पठाण यांनी भाषणाचा शेवट करताना गणपती बाप्पा मोरया असं म्हटलं होतं. अनेक मुस्लिमांच्या या प्रकारामुळे भावना दुखावल्या गेल्या होत्या. वारिस पठाण यांना रोष सहन करावा लागला होता. जोरदार टीका झाल्यानंतर वारिस पठाण यांनी जाहीर माफी मागितली आहे.

नेमका काय आहे प्रकार?

MIMचे नेते वारीस पठाण यांनी 23 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पा तुम्हा सगळ्यांची दुःखं दूर करो, असं म्हणत ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हटलं होतं. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला होता. सोशल मीडियावरुन हा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. प्रचंड टीका झाल्यानंतर वारीस पठाण यांनी मुस्लीम बांधवांची माफी मागण्याचा निर्णय घेतला.

काय म्हणाले वारिस पठाण?

यापुढे मी कधीही गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही. माझी चूक झाली. समस्त मुस्लिम बांधवांची मी माफी मागत आहे. अल्लाह मला माफ कर. माझ्यासाठी अल्लाकडे प्रार्थना करा.- वारीस पठाण, MIM आमदार

वारीस पठाण यांच्या ट्विटर हँडलने यासंदर्भातील व्हिडिओ रिट्विट केला आहे. या व्हीडिओत ते यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही असे म्हणत आहेत. ही माफी मागण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला अशीही चर्चा रंगते आहे. ज्यानंतर त्यांनी आपला माफीनामा सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. वारीस पठाण गणपती बाप्पा मोरया म्हणाले म्हणून त्यांच्यावर पक्षाने मोठ्या प्रमाणावर टीका केली. ज्यानंतर त्यांनी आपण चुकलो असे म्हणत माफी मागितली आहे.