पुणे महाराष्ट्र

पक्षाने आदेश दिला तर बारामतीतून लढेन आणि जिंकूनही दाखवेन- गिरीश महाजन

मुंबई : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी राजकीय पक्षांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगत आहे. सत्ताधारी तसेच विरोधकांकडून निरनिराळे दावे केले जात आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्याला सहज हरवू, अशी वक्तव्ये केली जात आहे. यामुळे प्रतिस्पर्ध्याकडूनही दावा करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. या सगळ्या राजकीय गदारोळात आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी झडताना पहायला मिळत आहेत. शिवसेना आणि भाजपची राजकीय कुरघोडी सुरु असताना त्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेससुद्धा मागं नसल्याचं पहायला मिळत आहे. मात्र आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे गिरीश महाजनांनी?

गिरीश महाजन राज्याचे जलसंपदा मंत्री आहे. उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांना महत्त्व आलं आहे. तेही आता शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल अशा पक्षांना शिंगावर घेणारी वक्तव्ये करत असतात. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं आहे. त्यांनी नुकताच एक दावा केला आहे, ज्यामुळे त्यांची सध्या जोरदार चर्चा आहे.

बारामती पवारांची राजधानी आहे. पक्षाने आदेश दिला तर मी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास तयार आहे. फक्त लोकसभा निवडणूकच लढवणार नाही तर मी याठिकाणी जिंकून सुद्धा दाखवेन.  – गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

बारामतीमधून लोकसभेला उभं राहण्याची भाषा गिरीश महाजन यांनी केली आहे. एवढंच नव्हे तर या मतदारसंघातून निवडून येऊ, असा दावा देखील त्यांनी केला आहे. सध्या राष्ट्रवादीकडे एकही महापालिका नाही त्यामुळे बारामतीमध्ये सुद्धा आम्ही विजयी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

बारामतीत कशी होईल टक्कर???

बारामती मतदारसंघावर नेहमीच राष्ट्रवादीचा दबदबा राहिला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. त्यानंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघाचं नेतृत्त्व करत आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी त्यांना टक्कर दिली होती, मात्र सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याचं स्वप्न महादेव जानकर यांना पूर्ण करता आलं नाही. यावेळी महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळेंविरोधात शड्डू ठोकले आहेत. यावेळी बारामतीतून आपणच खासदार होणार, असा दावा महादेव जानकर यांनी अनेकदा जाहीर व्यासपीठावरुन केला आहे. आता याच मतदारसंघातून लढण्याची इच्छा गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. महादेव जानकरांच्या पाठीमागे बारामती लोकसभा मतदारसंघातून जनाधार आहे, मात्र भाजपला तसा जनाधार अद्याप या मतदारसंघात तयार करता आल्याचं अजून तरी दिसत नाही. भाजप खरोखरच गिरीश महाजनांच्या इच्छेला गांभीर्यानं घेऊन त्यांना उमेदवारी देणार की रासपच्या महादेव जानकरांना मैदानात उतरवणार हे येणारा काळच सांगू शकतो.


IMPIMP