पुण्या-मुंबईत गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड भाड्याने मिळणार; खरं की खोटं?

बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड हे शब्द आता नियमित वापराचे झालेले आहेत. तरुणाईमध्ये या गोष्टीची सर्वाधिक क्रेझ पहायला मिळते. प्रत्येक मुलगा स्वतःला एखादी तरी गर्लफ्रेंड असावी, या विचारांचा असतो. तर अनेक मुलींनाही आपल्याला बॉयफ्रेंड असावा असं वाटतं. हल्ली हा स्टेटसचाही विषय झाला आहे. म्हणजे ज्याला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड नसेल त्याची हल्ली खिल्ली उडवली जाते. कॉलेजमध्ये गेली की तरुणाई हमखास या गोष्टींच्या मागे वेडी होताना दिसते. अर्थात प्रत्येकाच्या या आशा पूर्ण होतातच असं नाही. आता मुंबई-पुण्यात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड भाड्यानं मिळणार म्हटल्यावर अनेकांच्या या जुन्या आकांक्षांना धुमारे फुटले असतील पण जरा थांबा… होय, खरंच बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड भाड्याने मिळणार आहेत, मात्र नीट समजून घ्या हा प्रकार नेमका काय आहे…

नेमकी काय आहे संकल्पना?

सध्याचं जीवन खूपच धकाधकीचं होऊन गेलं आहे. तंत्रज्ञानाचा नको तितका वापर आपल्या आयुष्यात वाढला आहे. करिअर कामाचं टेंशन ताणतणाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये कोणताही एक वयोगट नाही. तर सर्वच वयोगटातील स्त्री-पुरुषांना याचा सामना करावा लागतो. हे नैराश्य लक्षात घेता त्यांना एका चांगल्या मित्राची गरज असते. हेच लक्षात घेऊन कौशल प्रकाश या २९ वर्षाच्या तरुणाने हा अनोखा व्यवसाय सुरु केला आहे.

नेमकं काय करतात हे लोक?

नैराश्यात असणाऱ्या व्यक्तीला आपले म्हणणे कोणीतरी ऐकून घ्यावे असं वाटत असतं. आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात. मात्र त्यांना त्यांचीच पडलेली असते त्यामुळे ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. उलट तेच आपल्याला त्यांच्या नैराश्याच्या गोष्टी सांगून आपलं नैराश्य वाढवतात. अशावेळी कोणीतरी आपल्याला समजून घ्यावे इतकीच आपली अपेक्षा असते.

कौशल प्रकाशने यासाठी एक अॅप्लिकेशन बनवलं आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून हेच काम साध्य होणार आहे. नैराश्यातील व्यक्तीचे समुपदेशन करणे ही जगावेगळी गोष्ट नसते. हे काम संवाद कौशल्ये असणारा व्यक्तीही चांगल्या पद्धतीने करु शकतो. यामध्ये ग्राहकांना 6 हॅंडसम मुलांचा पर्याय देण्यात येतो. ही मुलं 22 ते 25 वयोगटातील आहेत.  त्यातील एका मुलाची निवड त्यांना करता येईल. आपले मन मोकळे करण्यासाठी या मुलांसोबत ते वेळ घालवू शकतात. बाहेर फिरायला जाऊ शकता. जेवायला जाऊ शकता.

किती दर आकारला जातो?

या सुविधेअंतर्गत सेलिब्रिटी हवा असल्यास तासाला 3 हजार रुपये, मॉडेल हवा असेल तर 2 हजार रुपये आणि सामान्य व्यक्ती हवा असल्यास तासाला 300 ते 400 रुपये असा दर आकारण्यात येईल. मुंबई आणि पुण्यात सध्या ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. आगामी काळात तिचा इतर शहरांमध्ये विस्तार करण्यात येणार आहे. एक टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून त्याद्वारेही सुविधा दिली जाते. नागरिकांना फोनवर संवाद साधायचा असल्यास 15 ते 20 मिनीटासाठी 500 रुपये भरावे लागतील.

कौशल काय म्हणतो?

“मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे लोक वेगळे काही करत नसतात. ते केवळ आपलं म्हणणं ऐकून घेत असतात. मी स्वत:ही 3 वर्षे या फ्रेझमधून गेलो आहे. त्यामुळेच मला ही संकल्पना सुचली. तसा मी पेशाने इंटेरियर डेकोरेटर असून आता मी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.  हा उपाय मानसिक संतुलन मिळविण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल.