काँग्रेस सरकारने जशी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तशी तुम्हीही द्या; अमोल कोल्हेंची लोकसभेत मागणी

नवी दिल्ली | देशात शेतकऱ्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. पावसाने ओढ दिली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा परिस्थितीत युपीएने जशी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती तशीच कर्जमाफी भाजप सरकारने द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत केली आहे.

संसदेत केलेल्या जोरदार भाषणात अमोल कोल्हे यांनी भाजप सरकावर जोरदार टीकास्र सोडलं. शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रूपये देण्याची जहिरातबाजी केली. पण मला सांगा पाचशे रूपयांत शेतकऱ्याचं घर चालू शकते का? असा सवाल त्यांनी सरकारला केला.

विद्यमान सरकार देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर करायची, अशी चर्चा करतं. परंतू त्याच वेळी देशात हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरांना जेव्हा आम्ही ही गोष्ट सांगू तेव्हा तीच मुलं म्हणतील ते सगळं सोडून द्या हो… आमचा बाप गेलाय… तो आम्हाला परत आणून द्या, असा घणाघात अमोल कोल्हे यांनी केला आहे.

अमोल कोल्हे यांनी भाजपच्या दुट्टपी भूमिकेचाही यावेळी जोरदार समाचार घेतला. केंद्रिय मंत्री म्हणतात शेतकऱ्यांची कर्जमाफी करून काहीही होणार नाही. परंतू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्जमाफी केल्याचं सांगतात. भाजपकडून अशा दोन-दोन भूमिका का घेतल्या जातात? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

बैलगाडा शर्यतीसंदर्भात देखील कोल्हे यांनी आपली भूमिका मांडली. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ग्रामीण भागांकडे आकर्षित करता येईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, बैलांवरील अत्याचार रोखण्यासाठी 2014मध्ये बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. अमोल कोल्हे यांनी लोकसभेमध्ये आपली भूमिका स्पष्ट करत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याची मागणी केली आहे.