देश

5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यावसायिक परदेशी पळाला

नवी दिल्ली | भारतीय बँकांना चुना लावून परदेशी पळून जाण्याचं व्यावसायिकांचं सत्र सुरुच आहे. किंगफिशरचा मालक विजय मल्ल्या, हिरा व्यापारी नीरव मोदी, मेहुल चोक्सी, कनिष्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मालक भूपेश कुमार जैन यांच्यापाठोपाठ आणखी एका व्यापाऱ्यानं भारतीय बँकांना चुना लावून परदेशी पलायन केलं आहे. नितीन संदेसरा असे पळालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून त्याने एक दोन नव्हे तर तब्बल 5 हजार कोटी रुपयांचा चुना लावल्याची माहिती आहे. गुजरातमधील स्टर्लिंग बायोटेक कंपनीचा तो मालक असून  त्याच्यासह त्याचा भाऊ चेतन संदेसरा, भावजयी दिप्तीबेन संदेसरा आणि कुटुंबातील अन्य सदस्य नायजेरियात लपल्याची माहिती आहे.

संदेसराला भारतात आणणं शक्य आहे का?

सध्या भारत आणि नायजेरिया या दोन देशांमध्ये गुन्हेगारांचं अधिकृत प्रत्यार्पण करणारा कुठलाही करार नाही. त्यामुळे नितीन संदेसराला भारतात परत आणणे अत्यंत कठीण बाब असल्याचं सुरक्षा यंत्रणांचं म्हणणं आहे.

संदेसराला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पकडलं होतं?

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात नितीनला दुबईतून ताब्यात घेतल्याचं वृत्त आलं होतं. ती माहिती खोटी होती अशी माहिती आता उघड झाली आहे. सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेण्याआधीच नितीन आणि त्याचा संपूर्ण परिवार नायजेरियात पळून गेला असावा, असा अंदाज आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने माध्यमांना दिली आहे.

घोटाळेबाजांची चांदी होण्याची जास्त शक्यता-

भले मोठे घोटाळे केल्यानंतर नेमकं कोणत्या देशात पळून जावं आणि कोणत्या देशांदरम्यान भारताचे प्रत्यार्पण करार नाहीत याची यादीच या घोटाळेबाजांकडे असावी, अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. भारतीय बँकिंग व्यवस्थेतील बुडीत कर्जाची वाढत जाणारी आकडेवारी धक्कादायक आहे. त्यातच असे एकामागोमाग एक घोटाळे समोर येत आहेत. त्यामुळे भारतीय बँकिंग विश्वास एकच खळबळ उडाली आहे.

संदेसरा कुटुंबावर कारवाई?

सीबीआय तसेच अंमलबजावणी संचालनालयने स्टर्लिंग बायोटिकचे गुंतवणूकदार नितीन, चेतन आणि दिप्ती संदेसरा, राजभूषण ओमप्रकाश दीक्षित, विलास जोशी, चार्टर्ड अकाउंटंट हेमंत हठी, आंध्र बँकेंचे माजी संचालक अनुप गर्ग आणि अन्य काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

IMPIMP