देश

मोदी-शहांना मोठा धक्का; गुजरातमध्ये 23 आमदारांचं भाजपविरोधात बंड?

अहमदाबाद : भारतीय जनता पक्षानं आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे, मात्र भाजपमध्ये सारं काही आलबेल असल्याचं दिसत नाहीये. पक्षावर नाराज असलेल्या गुजरातमधील 23 आमदारांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. अतंर्गत गटबाजीमुळे हा प्रकार सुरु झाला आहे. 

गुजरातमध्ये सध्या सरकारी बाबूंच्या मनमानीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सरकारी बाबू आमदारांचं ऐकत नाही, अशी सत्ताधारी आमदारांची तक्रार आहे. भाजपाध्यक्ष अमित शहांपुढेही काही दिवसांपूर्वी हा मुद्दा मांडण्यात आला होता, मात्र कोणताच तोडगा न निघाल्यामुळे आमदारांनी बंड केलं आहे. 

भाजप आमदार मधु श्रीवास्तव, केतन इनामदार आणि योगेश पटेल यांनी पक्षाविरोधात बंड केलं आहे. आम्हीच नव्हे तर आणखी 20 आमदार पक्षावर नाराज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सरकारी बाबूंच्या आडून मुख्यमंत्री विजय रुपानी यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय.

दरम्यान, विजय रुपानी सध्या इस्त्रायलच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे या आमदारांनी बरोबर वेळ साधून बंड केल्याचं सांगण्यात येतंय. आता हा मुद्दा दिल्लीच्या दरबारी जाणार आहे. अंतर्गत बंडाळीमुळे मोदी-शहा जोडीची डोकेदुखी नक्कीच वाढली आहे, त्यामुळे ते याप्रकरणी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

IMPIMP