काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झालं आहे. ते 63 वर्षांचे होते.
कामत आपल्या काही कामानिमित्त नवी दिल्लीला गेले होते. तिथं त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दिल्लीतील प्रायमस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
काँग्रेसमधील अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. काँग्रेसमध्ये त्यांनी नेहमीच जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याचं म्हटलं जातंय.
गुरुदास कामत यांनी 1972 मध्ये विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. 1976 मध्ये त्यांनी एनएसयूआयचे अध्यक्षपद भूषवले. 1984 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. 2009 ते 2011 या कालावधीत ते केंद्रीय राज्यमंत्री देखील होते.