“हॅलो… मी अजित पवार बोलतोय”

पिंपरी : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून आपलं नशिब आजमावत आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या मतदानांमध्ये मावळचं मतदान शेवटच्या टप्प्यात आहे त्यामुळे आता या भागात प्रचाराला रंगत आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडलं आहे. त्यामुळे सर्व पवार कुटुंब पार्थ पवार यांच्या प्रचारात उतरल्याचं चित्र आहे.

मुलगा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने स्वतः अजित पवार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. दिवसभर प्रचारदौरा करणे आणि गाडीत बसल्यानंतर मधल्या वेळात फोन करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे.

अजित पवार पिंपरीतून स्वतः खासदार होते. 25 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांचा या शहराशी संबंध आहे, त्यामुळे अजित पवार यांना या मतदारसंघाची अन् नेत्यांची खडानखडा माहिती आहे.

शहरातील विविध भागातील नागरिक आणि जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांचे फोन आले आहेत.

“हॅलो मी अजित पवार बोलतोय. राष्ट्रवादीला मतदान करा,” असं अजित पवार फोनवर सांगत असतात. अगदी मोजक्या शब्दात ते पार्थ पवार यांना आशीर्वाद देण्याची विनंती करतात.  

पार्थ पवार यांच्यासाठी ही लढत वाटते तितकी सोपी नाही. शिवसेनेचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना शिवसेनेने पुन्हा एकदा संधी दिली आहे.

दुसरीकडे पार्थ पवार यांच्या उमेदवारीला स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा केली होती. सुप्रिया आणि माझ्याव्यतिरिक्त पवार कुटुंबातील कुणीही निवडणूक लढणार नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं.

शरद पवार यांनी शेवटी आपल्याच निर्णयापासून माघार घेतली अन् माढ्यातून लढण्याचा निर्णय मागे घेतला, तर दुसरीकडे मावळमधून पार्थ पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातून विस्तव जात नसल्याने राष्ट्रवादीसाठी ही फायदेशीर गोष्ट होती. मात्र आता या दोघांचं मनोमिलन झाल्यानं पार्थ पवार यांच्यापुढे कडवं आव्हान निर्माण झालं आहे.

कोणताही धोका पत्करण्याची पवार कुटुंबाची इच्छा नाही, त्यामुळे आता संपूर्ण पवार कुटुंब पार्थ यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलं आहे. सभांचा आणि प्रचारफेऱ्यांचा सपाटा सुरु आहे. या सगळ्यात सर्वात जास्त चर्चा आहे ती अजित पवारांकडून विविध पक्षाच्या नेते तसेच कार्यकर्त्यांने केल्या जाणाऱ्या फोनची…

हे वाचलं का?