…तर कोरोनाचा उद्रेक अटळ, तुकाराम मुंढे यांचा गंभीर इशारा

नागपूर | नागपुरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या उपायोजनांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली. अनलॉकिंगला सुरूवात झाल्यापासून नागरिक सऱ्हास नियम पायदळी तुडवत आहेत हे लक्षात आल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी फेसबुक पोस्ट करत कोरोना कसा फोफावू शकतो, या संदर्भातला त्यांनी गंभीर इशारा दिला आहे.

तुकाराम मुंढे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात-

“कोरोनाचा नागपुरात प्रवेश झाल्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. या काळात आवश्यक त्या सर्व खबरदारी घेण्यात आल्या. शहराच्या आरोग्यासाठी काही कठोर निर्णयही घेण्यात आले. परिणामी ३१ में पर्यंत नागपुरात बाधितांची संख्या आटोक्यात होती. १ जूनपासून ‘अनलॉक १’ सुरू झाले. अनेक बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली. मात्र हे करीत असताना शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करावे, असे नागरिकांना बजावण्यात आले होते.”

“सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयात असताना मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत, दुचाकीवर केवळ एक व्यक्ती आणि चार चाकी वाहनात वन प्लस टू हे नियम प्रत्येकाने पाळले तर कोरोनाचे संक्रमण रोखता येईल. मात्र, केवळ काही अपवाद वगळता सर्रास या नियमांचा भंग केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.”

“परिणामी नागपूर शहरात १ जूननंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाटयाने वाढ झाली. इतकी की आज या आकड्याने हजारी गाठली. नागरिकांची ही बेपर्वाई इतर नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहे. अजूनही वेळ गेली नाही. विनाकारण घराच्या बाहेर निघू नका. नियम पाळा. कोरोनाची साखळी खंडित करण्यास प्रशासनाला मदत करा”.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-“मॉल आणि व्यापारी संकुले सुरू करण्यास परवानगी द्या”

-ऑनलाईन अभ्यासामुळे मुलांच्या डोळ्यांवर परिणाम, गुजरात हायकोर्टाचा सरकारला हा सवाल

-शेतकऱ्याचा लेक बनला ‘गरूड कमांडो’.. देशात 59 वा क्रमांक मिळवून आई बापाच्या कष्टाचं चीज!

-बापानं प्रसंगी सालदार बनून मुलाला शिकवलं, पोरानं उपजिल्हाधिकारी बनून पांग फेडलं!

-सचिनला मी दोनवेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिलं, तब्बल 15 वर्षानंतर या अंपायरने केलं मान्य