मुंबई | वोडाफोन आणि आयडिया या टेलिकॉम क्षेत्रातील दोन कंपन्या काही दिवसांपूर्वी एकत्र आल्या आणि नव्या वोडाफोन आयडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली. या घटनेमुळे दोन्ही कंपन्यांचे नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतोय. कधी नेटवर्क नाही तर कधी 4G नेटवर्क दाखवत असूनही इंटरनेट चालू नाही, अशा तक्रारी ग्राहकांनी सुरु केल्या आहे. दोन्ही कंपन्यांच्या लाखो ग्राहकांना हा त्रास सहन करावा लागत आहे.
वोडाफोन आणि आयडिया या भारतातील सर्वात मोठ्या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या होत्या. दोन्ही कंपन्या एकत्र येण्याची घोषणा होताच ही सर्वाधिक ग्राहक असलेली कंपनी ठरली. कंपन्या एकत्र आल्याने दोन्ही कंपन्यांचे ग्राहक एकाच छताखाली आले. तत्पूर्वी दोन्ही कंपन्या चांगल्या सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या म्हणून परिचित होत्या, किंबहुना त्याच आधारवर कोट्यवधी ग्राहक त्यांच्याकडे होते.
दोन्ही कंपन्या एकत्र आल्याने या कंपनीचं नेटवर्क आणखी मजबूत होईल आणि अधिक चांगली सेवा मिळेल हा ग्राहकांचा समज होता, मात्र हा समज खोटा ठरला. लाखो ग्राहकांना आजमितीला कॉल ड्रॉप, नेटवर्क नसणे, नेटवर्क दाखवत असले तरी इंटरनेट न चालणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
आयडिया आणि वोडाफोनच्या ग्राहकांसाठी कॉलड्रॉपची समस्या सर्वात मोठी समस्या ठरली आहे. फोनवर बोलता बोलता अनेकदा समोरच्याचा आवाज ऐकू येईनासा होतो. कधी आवाज व्यवस्थित येत नाही तर कधी समोरच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही. बोलता बोलता फोन कट होण्याचं प्रमाणही मोठं आहे.
इंटरनेट वापरतानाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नेटवर्क मजबूत दाखवत असलं अगदी 4Gचा सिम्बॉल दिसत असला तरी एखादी गोष्ट गुगल केली तर ती सर्च होईलच असं नाही. त्यामुळे इंटरनेट वापरणारांची मोठी पंचाईत झाली आहे.
आता दोन्ही कंपन्या एकच असल्याने सीमकार्ड कधी आयडियाचं नेटवर्क घेतं तर कधी वोडाफोनचं नेटवर्क घेतं. कधी कधी तर नेटवर्कच येत नाही. अगदी एखाद्याला फोन लावताना चांगलं नेटवर्क दाखवत असेल तर नंबर डायल केल्यानंतर अचानक नेटवर्क गायब होतं. अशावेळी ग्राहकांना मनस्ताप तर होतोच शिवाय चिडचीडही होते.
यासंदर्भात वोडाफोनच्या कस्टमर केअरशी संपर्क केल्यानंतर त्यांच्याकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याचं समोर आलं आहे. अॉटोमॅटिक नेटवर्क न निवडता मॅन्युअल नेटवर्क निवडा, असा तात्पुरता इलाज सांगितलं जात आहे. मात्र या समस्येवरचा हा काही ठोस उपाय नाही, असं सांगताच संबंधित कंपनीचे प्रतिनिधी निरुत्तर झाल्याचं पहायला मिळत आहे.
कंपनी ग्राहकाला चांगली सेवा देत नसल्यास ग्राहकांना आपला नंबर दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे आयडिया आणि वोडाफोनची सेवा अशीच राहिल्यास या कंपन्यांना मोठा फटका बसू शकतो.
सोशल मीडियावर दोन्ही कंपन्यांच्या विरोधी कॅम्पेन-
आयडिया आणि वोडाफोनच्या वाढत्या तक्रारींमुळे ग्राहक त्रस्त आहेत. याचे परिणाम सोशल मीडियात पहायला मिळत आहे. दोन्ही कंपन्यांच्या विरोधात सोशल मीडियात कॅम्पेन सुरु झालेलं पहायला मिळत आहे. एक बॅनर सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. “तुम्हाला माझ्याशी संपर्क करण्यास अडचण येत असेल तर कृपया मला व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक मेसेंजरवर पिंग करा. आयडिया आणि वोडाफोनचे धन्यवाद” असं या बॅनरमध्ये म्हटलंय. ज्यांना गरज असेल ते हा बॅनर फुकट वापरु शकतात, अशी टीपही सोबत जोडण्यात आली आहे. आयडिया आणि वोडाफोनच्या सुविधेवर नाराज असलेले अनेक ग्राहक सोशल मीडियात हा बॅनर व्हायरल करत आहेत.
ग्राहकांच्या निवडक संतप्त पोस्ट-