Top news बीड महाराष्ट्र राजकारण

“मोदी सरकारने शेतकऱ्यांना न्याय तर दिलाच त्याबरोबर पैसा, उत्पादनाला हमीभाव आणि…”

बीड | गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर चालू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे देशातील वातवरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारसह अनेक पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने उभे ठाकले आहेत. केंद्र सरकारने नव्याने संमत केलेले कृषी कायदे सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी देशभरातून केली जात आहे.

मोदी सरकारने आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले आहेत. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केल्यानंतर राष्ट्रवादी नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींवर घणाघात केला होता. शेतकऱ्यांना पैसे नको न्याय हवा आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. आता सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याला खासदार प्रीतम मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना न्याय तर दिलाच आहे. मात्र त्याबरोबरच पैसा, त्यांच्या उत्पादनाला हमीभाव आणि शेतकऱ्यांची सुरक्षा देण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले आहे, असं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे.

भाजपने आज संपूर्ण राज्यात शेतकरी संवाद अभियान सुरु केलं आहे. या अभियानांतर्गत राज्यभरातील अनेक भाजप नेते शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना कृषी विधेयकाचं महत्व पटवून देत आहेत. बीडमध्ये देखील प्रीतम मुंडे यांनी शेतकरी संवाद अभियानात भाग घेतला, यावेळी त्या बोलत होत्या.

दरम्यान, कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता किसान मोर्चातर्फे देखील किसान आत्मनिर्भर यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेत माजी मंत्री सदाभाऊ खोत देखील सामील झाले आहेत. सदाभाऊ खोत यांनी या यात्रेदरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, मार्केट कमिटीत मालाच्या विक्रीसंदर्भात विरोध करतात, मात्र हेच शरद पवार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात. शरद पवारांचं मनावर घेऊ नका. ते नेहमी उलट बोलतात.

जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल तेव्हा नेमका दुसऱ्या बाजूने उगवत असतो. शरद पवार यांनी आत्मचरित्रातही तसं लिहून ठेवलं आहे. शरद पवार तुम्ही जास्त खोटं बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात, अशी जोरदार टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! अभिनेते रजनीकांत रुग्णालयात दाखल, जडला ‘हा’ गंभीर आजार

“शरद पवार तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे”

ममता बनर्जींला मोठा धक्का! पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेसची मोठी राजकीय खेळी

प्रियांका गांधींसह अनेक कॉंग्रेस नेत्यांना अटक आणि सुटका

राजधानीत राडा! शेतकऱ्यांना पाठींबा दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी फोडलं आपच्या आमदाराचं ऑफिस; पाहा व्हिडिओ