“तुमची हिम्मत कशी झाली?”; लतादीदींसाठी बाळासाहेबांनी थेट गुलशन कुमारांना झापलं

मुंबई | राज्याच्या राजकारणावर आणि समाजकारणावर आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये दिवंगत नेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव येतं. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानं पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे आणि लता मंगेशकर यांच्यातील भावनिक ऋणानुबंधाची चर्चा होत आहे.

बाळासाहेब ठाकरे हे साहित्याची जाण असणारे व्यक्ती होते. आपल्या पूर्ण राजकीय आणि सामाजिक आयुष्यात बाळासाहेब कलाकारांच्या पाठीशी उभं राहिल्याच्या अनेक घटनांचा हा महाराष्ट्र साक्षीदार आहे.

लता मंगेशकर यांच्या आवाजानं देशाच्या सांस्कृतीक क्षेत्रास एका नवीन उंचीवर नेलं होतं. लतादीदींच्या जाण्यानं देशानं आपल्या एका रत्नाला गमावलं आहे. त्यांच्या अंत्यविधीच्या ठिकाणी ठाकरे कुटुंब भावूक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

बाळासाहेब ठाकरेंना लतादीदी आपल्या वडिलांसमान मानत होत्या. लतादीदींच्या प्रत्येक अडचणीत बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे राहीले होते. परिणामी दोघांच्या नात्याची चर्चा अनेकदा झाली आहे.

लतादीदींच्या निधनानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या सून आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आमच्यावर मोठा आघात झाल्याचं म्हटलं आहे. लतादीदींच्या आठवणीत रश्मी ठाकरे भावूक झाल्याचं दिसत होतं.

लतादीदींनी एका मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यातील एका संवादाबद्दल सांगितलं आहे. बाळासाहेब ठाकरे आजारी असल्याचं जेव्हा मला कळालं तेव्हा मी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी गेले आणि बाळासाहेबांची विचारपूस केली होती, असं लतादीदी म्हणाल्या होत्या.

बाळासाहेब खूप आजारी असल्यानं त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचं त्यांनी सांगितल्यावर लतादीदींनी त्यांना जेवण्याचा आग्रह केला. लतादीदींनी त्यांना सुप पिण्यास सांगितल्यावर त्यांनी लतादीदींचं ऐकलं, असंही लतादीदी म्हणाल्या होत्या.

1990 च्या दशकात भारतीय सिनेमासृष्टीत मोठी घडामोड घडत होती. टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्यासोबत लता मंगेशकर यांची पार्टनरशिप तुटल्यानं मोठी समस्या निर्माण झाली होती.

1992 मध्ये अभिनेता गोविंदा आणि जुही चावलाचा ‘राधा का संगम’ हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. निर्मात्यांनी लता मंगेशकर यांच्या आवाजाची मागणी केली होती. पण गुलशन कुमार यांनी अनुराधा पौडवाल यांचा आवाज देण्यासाठी गाण्याचे हक्क विकत घेतले. बाळासाहेब ठाकरेंना ही गोष्ट समजताच त्यांना राग अनावर झाला.

बाळासाहेब ठाकरेंनी थेट गुलशन कुमारला फोन लावला अन् तुमची हिम्मत कशी झाली?, असा सवाल कुमार यांना केला. लता मंगेशकर महाराष्ट्राच्या गौरव आहेत त्यांच्या जागी दुसऱ्याला संधी कशी देता, असं म्हणत बाळासाहेब ठाकरे गुलशन कुमार यांच्यावर रागावले होते.

बाळासाहेबांच्या एका फोननंतर लगेच गाण्यासाठी लता मंगेशकर यांची निवड करण्यात आली. हा एकचं नाही तर असे अनेक किस्से आहेत जे लता मंगेशकर आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नात्याला मोठं करतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ओमिक्राॅनमुळे ‘या’ लोकांचा होतोय मृत्यू, ICMRच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

मोठी बातमी! नितेश राणेंची तब्येत पुन्हा बिघडली, तातडीने कोल्हापूरला हलवलं

“एक हजार पाकिस्तानही लता दीदींच्या जाण्याचं नुकसान भरून काढून शकत नाही”

शाहरूखला ट्रोल करणाऱ्यांना ऊर्मिला मार्तोंडकरने सुनावलं, मोदींचा ‘तो’ फोटो केला शेअर 

दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी; सुप्रिया-शरद पवारांचा हा फोटो ‘का’ होतोय व्हायरल?