भारताचा आफ्रिकेवर दणदणीत विजय!

मोहाली : कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 गडी राखून मात केली आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मोहालीच्या मैदानावरील या विजयामुळे भारताने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. विराटने या सामन्यात नाबाद 72 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

कर्णधार क्विंटन डी-कॉक आणि टेंबा बावुमाने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-20 सामन्यात 149 धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणाऱ्या क्विंटन डी-कॉकने अर्धशतकी खेळी करत आफ्रिकेला आश्वासक धावसंख्या गाठून देण्यात मदत केली.

हार्दिक पांड्याने डेव्हिड मिलरचा त्रिफळा उडवत आफ्रिकेला आणखी एक धक्का दिला. अखेरच्या षटकांमध्ये धीम्या गतीचे चेंडू टाकत भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. या जोरावर आफ्रिकेला 149 धावांवर रोखण्यात भारताला यश मिळालं. भारताकडून दिपक चहरने 2, रविंद्र जाडेजा-नवदीप सैनी आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

दक्षिण आफ्रिकेकडून 150 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर रोहित शर्मा फेलुक्वायोच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताने विजयी लक्ष्याच्या दिशेने यशस्वी आगेकूच केली. 

धवन 40 धावांवर शम्सीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर ऋषभ पंतही अवघ्या 4 धावा काढून माघारी परतला. यानंतर विराट कोहलीने श्रेयस अय्यरला साथीला घेत आपलं अर्धशतक पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दक्षिण आफ्रिकेकडून फेलुक्वायो, शम्सी आणि फॉर्च्युन यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. 

महत्वाच्या बातम्या-