टी-20 विश्वचषकात दिव्यांगांनी मिळवून दिलं भारताला विश्वविजेतेपद

वूर्स्टर : रवींद्र संतेचे दमदार अर्धशतक आणि कुणाल फणसेच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने अपंगांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवलं आहे. भारताने इंग्लंडवर 36 धावांनी मात केली आहे. भारताने दिलेल्या 181 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 षटकांत 9 बाद 144 धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडने सलामीवीर जेमी गुडविन (17) लवकर गमावले. सनी गोयतने त्याला बाद केले. परंतु अँगुस ब्राऊन (44) आणि कॅलम फ्लीन (27) यांनी दुसऱ्या गडयासाठी 66 धावांची भागीदारी रचल्यामुळे सामन्यात चुरस निर्माण झाली.

सनीनेच ब्राऊनला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर कुणालने कर्णधार ईआन नैर्न (7) व लिआम थॉमस (1) यांना एकाच षटकात माघारी धाडल्यामुळे इंग्लंडची 1 बाद 90 वरून 4 बाद 99 धावा अशी अवस्था झाली.

त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना सावरण्याची संधीच दिली नाही. 129 धावांवर नववा फलंदाज बाद झाल्यावर इंग्लंडचा डाव संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली. परंतु अखेरच्या जोडीने शेवटची 2.2 षटके खेळून काढली. मात्र ते इंग्लंडचा पराभव टाळू शकले नाहीत.

प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 बाद 180 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. रविंद्रने 34 चेंडूंत चार षटकार व दोन चौकारांच्या सहाय्याने 53 धावा फटकावल्या.

सलामीवीर कुणाल आणि कर्णधार विक्रांत केनी यांनीसुद्धा बहुमूल्य योगदान दिले. या दोघांनी तिसऱ्या खेळाडूसाठी 67 धावांची भागीदारी रचली. कुणाल (36) सलग दुसरे अर्धशतक झळकावण्यात अपयशी ठरला, तर विक्रांत 29 धावांवर बाद झाला.

सुग्नेश महेंद्रनने अवघ्या 11 चेंडूंत चार षटकारांसह धडाकेबाज 33 धावा फटकावल्यामुळे भारताने पावणेदोनशे धावांचा टप्पा गाठला. इंग्लंडतर्फे लिआम ओब्राएनने सर्वाधिक दोन बळी मिळवले.

महत्वाच्या बातम्या-

-प्रकाश आंबेडकर विधानसभा निवडणूक ‘या’ चिन्हावर लढणार!

-1998 नंतर राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच खेळले जाणार क्रिकेट; आयसीसीची घोषणा

-…म्हणून ग्रामीण भागात 10 हजार तर शहरात 15 हजार रुपयांची मदत करणार- मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

-पूरग्रस्त आणखी सावरले नाहीत अन् भाजप म्हणतंय मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवा!

-“तू आम्हाला प्रत्येक क्षणी आठवतेस…आणि तू आमच्या सोबत अनंत काळापर्यंत राहशील”