IPL 2021: हैदराबादच्या पराभवाची हॅट्रिक, मुंबईचा 13 धावांनी शानदार विजय

चेन्नई| शनिवारी, 17 एप्रिल इंडियन प्रीमीयर लीग 2021 हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने हैदराबादसमोर 151 धावांचं माफक आव्हान उभं केलं होतं. परंतु मुंबईने दिलेलं हे आव्हान हैदराबादच्या संघाला पेलवलं नाही. परिणामी हैदराबादला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

आपल्या भेदक बॉलिंगच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा आयपीएलच्या या मोसमातला धमाकेदार विजय मिळवला आहे. मुंबईने सनरायजर्स हैदराबादचा 13 रनने पराभव केला आहे. 151 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद 137 रनवर ऑल आऊट झालं.

फलंदाजीचा निर्णय घेऊन रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक यांनी मुंबईसाठी चांगली सुरुवात केली. या दोघांनी 55 धावांची भागीदारी उभारली. पॉवरप्लेच्या 6 षटकात मुंबईने बिनबाद 53 धावा केल्या. रोहितने आक्रमक तर क्विंटनने संयमी खेळी करत त्याला साथ दिली. मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहित शर्मा विजय शंकरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

रोहितने 2 चौकार आणि 2 षटकारांसह 32 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवलाही शंकरने तंबूचा मार्ग दाखवला. वॉर्नरने राशिद खान आणि मुजीब उर रेहमान यांना गोलंदाजीसाठी पाचारण करत मु्ंबईची धावगती रोखली. शतकाकडे कूच करताना मुंबईने डि कॉकला गमावले. मुजीबने त्याला वैयक्तिक 40 धावांवर बाद केले. दुसऱ्या बाजूला संथ खेळणारा ईशान किशनही दबावात बाद झाला. किशनने 21 चेंडूत फक्त 12 धावा केल्या.

त्यानंतर कायरन पोलार्डने मोर्चा सांभाळला. एकेरी, दुहेरी धावा, कधीकधी मोठे फटके यांचे मिश्रण साधत त्याने मुंबईच्या धावसंख्येला आकार दिला. भुवनेश्वरने हैदराबादसाठी टाकलेल्या शेवटच्या षटकात पोलार्डने दोन षटकार खेचत मुंबईला दीडशे धावांचा आकडा गाठून दिला.

पोलार्ड 22 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांसह 35 धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून विजय शंकर आणि मुजीब उर रेहमान यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर, खलील अहमदला 1 बळी घेता आला.

मुंबईच्या 151 धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी दणक्यात सुरुवात केली. या दोघांनी पॉवरप्लेदरम्यान ट्रेंट बोल्ट आणि अॅडम मिल्ने या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पॉवरप्लेमध्ये हैदराबादच्या 57 धावा फलकावर लागल्या होत्या.

त्यानंतर फिरकीपटू कृणाल पंड्याने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. कृणालच्या चेंडूवर फटका खेळताना जॉनी बेअरस्टो 8व्या षटकात हिट विकेटचा शिकार ठरला. बेअरस्टोने 22 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 43 धावा केल्या. बेअरस्टो बाद झाल्यानंतर रोहित शर्माने फिरकीपटू राहुल चहरला गोलंदाजीला बोलावले. त्याने बेअरस्टोनंतर आलेल्या मनीष पांडेला पोलार्डकरवी झेलबाद करत हैदराबादला दुसरा धक्का दिला. पांडेला फक्त 2 धावाच करता आल्या.

त्यानंतर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर 12व्या षटकात चोरटी धाव घेताना धावबाद झाला. हार्दिक पंड्याने यष्ट्यांवर आपला अचूक थ्रो मारत वॉर्नरला माघारी धाडले. वॉर्नरने 36 धावांची खेळी केली.

यानंतर मात्र, हैदराबादच्या डावाला उतरती कळा लागली. मधल्या फळीत विजय शंकरने थोडा प्रतिकार केला. मात्र डावाच्या शेवटी तोही दबावात बाद झाला. मुंबईकडून राहुल चहरने अप्रतिम फिरकी गोलंदाजीचे प्रदर्शन करत 4 षटकात 19 धावा देत 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय, बोल्टलाही 3 बळी घेता आले.

महत्वाच्या बातम्या – 

पतीपेक्षा वयाने मोठी असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने…

क्या बात है! आता तुरुंगात सुरू होतंय रेडिओ स्टेशन, गुन्हेगार होणार रेडिओ जॉकी

सलग 17 व्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; वाचा आजचा दर

गाडीसमोरुन अचानक सिंह शिकार करण्यासाठी धावून आला अन् मग…; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

मिका सिंगने नॅशनल टीव्हीवर ‘या’ सिंगरला लग्नासाठी घातली मागणी; व्हिडीओ व्हायरल