IPL 2021: अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा मुंबईवर 6 विकेट्सने विजय

मुंबई| मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या रंगतदार सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात हेटमायरने चौकार मारत विजय नोंदवला. कमी धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली सामना गमावणार की काय अशी परिस्थिती होती मात्र दिल्लीच्या फलंदाजांनी संयम खेळी करताना एकेरी आणि दुहेरी धावांच्या मदतीने लक्ष्याचा पाठलाग केला.

रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक यांनी मुंबईच्या डावाची सुरुवात केली. तिसऱ्या षटकात दिल्लीचा गोलंदाज मार्कस स्टॉइनिसने क्विंटन डि कॉकला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. डि कॉकने 2 धावा केल्या. त्यानंतर रोहितने सूर्यकुमारला हाताशी घेत पहिल्या पॉवरप्लेमध्ये मुंबईसाठी 1 बाद 55 धावा केल्या. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर आवेश खानने दिल्लीला यश मिळवून दिले.

चांगल्या फॉर्मात खेळणाऱ्या सूर्यकुमारला मुंबईने 7व्या षटकात गमावले. सूर्यकुमारने 24 धावा केल्या. त्यानंतर अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या रोहितला अमित मिश्राने आपल्या जाळ्यात अडकवले. मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहित स्मिथकडे झेल देऊन बसला. त्याने 3 षटकार आणि 3 चौकारांसह 44 धावा केल्या.

रोहित बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. मिश्राने हार्दिक पंड्याला शून्यावर बाद केले. हार्दिकनंतर कृणाल पंड्याही स्वस्तात बाद झाला. त्याला ललित यादवने बाद केले. त्यानंतर आलेल्या कायरन पोलार्डला मिश्राने आपल्या गुगलीत अडकवले.

या पडझडीनंतर ईशान किशन आणि जयंत यादवने छोटेखानी भागीदारी उभारली. किशनने 26 तर यादवने 23 धावा केल्या. मिश्राव्यतिरिक्त आवेश खानने 15 धावा देत 2 बळी टिपले.

मुंबईच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. फिरकीपटू जयंत यादवने दिल्लीचा मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉला दुसऱ्याच षटकात माघारी पाठवले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि शिखर धवन संघासाठी उभे राहिले. पहिल्या 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने 1 बाद 39 धावा केल्या. 9व्या षटकात स्मिथ आणि धवनने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. त्यानंतर कायरन पोलार्डने मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. त्याने स्टीव्ह स्मिथला वैयक्तिक 33 धावांवर पायचित पकडले. सुसाट फॉर्मात असलेला धवन संघाला विजय मिळवून देईल असे वाटत होते, पण 15व्या षटकात दिल्लीने धवनला गमावले.

मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरने त्याला कृणालकरवी झेलबाद केले. धवनने 5 चौकार आणि एका षटकारासह 45 धावांची खेळी केली. धवननंतर पंतही स्वस्तात माघारी परतला, पण शिमरोन हेटमायर आणि ललित यादव यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीने 19.1 षटकात 4 गडी गमावत हे आव्हान गाठले.

महत्वाच्या बातम्या – 

…..म्हणून अनुष्कानं लेक वामिकाला छातीशी घट्ट कवटाळलं,…

‘या’ कारणामुळे बाबिलनं वडिल इरफान खानच्या आठवणी…

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळे निधन

‘उकडीचा मोदक दिसल्यावरचा आनंद’ प्रिया बापटच्या…

युजवेंद्र चहलला पहिली विकेट मिळताच पत्नि धनश्रीला अश्रू…