चेन्नई| आयपीएलच्या चौदाव्या पर्वाची सुरुवात रोमहर्षक पद्धतीने झाली आहे. सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला गेला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातही मुंबई इंडियन्सची सुरूवात खराब झाली आहे. आरसीबीच्या संघाने यावेळी दमदार कामगिरी करत विजयी सलामी दिली. 2021 हंगामाच्या सलामीच्या लढतीत शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्स विरुद्ध 2 विकेट्सने विजय मिळवला.
बंगळुरुकडून एबी डीव्हीलियर्सने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेलने 39 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जाॅनसेनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी बंगळुरूकडून जलदगती गोलंदाज हर्षल पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेत मुंबईचा अर्धा संघ पव्हेलियनमध्ये पाठवला होता. या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
त्यामुळे तो आयपीएल इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून गोलंदाजी करताना एका सामन्यांत 5 विकेट्स घेणारा केवळ तिसराच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी बेंगलोरकडून असा कारनामा केवळ अनिल कुंबळे आणि जयदेव उनाडकटलाच करता आला आहे.
मुंबईचा डाव
आरसीबीकडून फलंदाजीचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर रोहित शर्मा आणि ख्रिस लिन या फलंदाजांची जोडी सलामीसाठी मैदानात आली. पहिल्या दोन षटकात बंगळुरूच्या गोलंदाजांनी रोहित-लिनला हात खोलूू दिले नाही. मात्र, तिसऱ्या षटकात रोहितने सिराजला यंदाच्या हंगामातील पहिला चौकार खेचला. रोहित मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असताना तो धावबाद झाला. यजुर्वेंद्र चहलच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेताना रोहित वैयक्तिक 19 धावांवर माघारी परतला. पहिल्या पाच षटकात मुंबईने 1 बाद 30 धावा उभारल्या.
रोहितनंतर आलेल्या सूर्यकुमारने लिनला हाताशी घेत संघासाठी अर्धशतकी भागीदारी रचली. बंगळुरूचा गोलंदाज काईल जेमीसनने सूर्यकुमारला यष्टीमागे झेलबाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला. सूर्यकुमारने 31 धावांची खेळी केली. सूर्यकुमारनंतर लिनही तंबूत परतला. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने त्याला अर्धशतक करू दिले नाही. लिनने 4 चौकार आणि 3 षटकारांसह 49 धावा केल्या. बंगळुरूने स्थिरावलेल्या सूर्यकुमार-लिनला बाद केल्यानंतर हार्दिक पंड्या आणि ईशान किशनची जोडी मैदानात आली. मात्र, वेगवान गोलंदाज हर्शल पटेलने हार्दिकला पायचित पकडत मुंबईला चौथा धक्का दिला. त्यानंतर हर्षलने किशनला वैयक्तिक 28 धावांवर माघारी धाडत आपला दुसरा बळी घेतला. त्यानंतर आरसीबीने मुंबईच्या फलंदाजांना जास्त फटकेबाजी करू दिली नाही. हर्षलने शेवटच्या षटकात कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्डला लागोपाठ चेंडूवर बाद केले. याच षटकात हर्षलने जानसेनला यॉर्कर टाकत आपले 5 बळी पूर्ण केले. या षटकात मुंबईला एकच धाव मिळाली. हर्षलने 27 धावा देत 5 बळी घेतले.
आरसीबीचा डाव
मुंबईच्या 160 धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि वॉशिंग्टन सुंदरने बंगळुरूसाठी सलामी दिली. बोल्टच्या पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहितने वॉशिंग्टनला जीवदान दिले. पाचव्या षटकात कृणालने वॉशिंग्टन सुंदरला बाद करत बंगळुरूला पहिला धक्का दिला. सुंदरने 10 धावा केल्या. पाच षटकात बंगळुरूने 1 बाद 41 धावा केल्या. पहिल्या षटकात महागड्या ठरलेल्या बोल्टने पदार्पणवीर रजत पाटीदारला बाद करत बंगळुरूला दुसरा धक्का दिला.
त्यानंतर विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलने अर्धशतकी भागीदारी रचली. जसप्रीत बुमराहने विराटला बाद करत ही भागीदारी तोडली. विराटने 4 चौकारांसह 33 धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर मॅक्सवेलही मैदानावर जास्त वेळ थांबू शकला नाही. जलदगती गोलंदाज जानसेनने त्याला झेलबाद केले. मॅक्सवेलने 3 चौकार आणि 2 षटकारांसह 39 धावा केल्या. याच षटकात जानसेनने शाहबाझ अहमदला बाद करत बंगळुरूला अजून संकटात टाकले. त्यानंतर मैदानात आलेला डॅन ख्रिश्चनही काही खास कामगिरी करू शकला नाही. बुमराहने त्याला स्वस्तात बाद केले. मात्र, त्यानंतर एबी डिव्हिलियर्सने एकट्याने मोर्चा सांभाळत बुमराह, बोल्टवर आक्रमण केले. डिव्हिलियर्स बंगळुरुला आरामात विजय मिळवून देणार असे वाटत असताना तो शेवटच्या षटकात धावबाद झाला. त्याने 27 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 48 धावा केल्या. डिव्हिलियर्स बाद झाल्यानंतर सिराज-पटेलने बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईकडून बुमराह आणि जानसेनने प्रत्येकी 2 तर, बोल्ट आणि पंड्याने प्रत्येकी 1 बळी घेतला.
दरम्यान, आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्स ही सगळ्यात यशस्वी टीम आहे. आतापर्यंत 5 वेळा मुंबईने आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं, तर विराट कोहलीच्या बँगलोरला अजूनपर्यंत एकदाही आयपीएल जिंकता आलेली नाही. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली मुंबईने आयपीएल जिंकली आहे.
महत्वाच्या बातम्या –
रुपयात घसरण झाली अन् सोन्याचे दर वधारले, वाचा आजचे दर
चक्क रस्त्यावर रंगली WWE! चिमुरड्यांच्या हाणामरीचा हा व्हिडीओ नक्की बघा, तुम्हीही पोट धरून हसाल
संतापलेल्या द्रविडचा अवतार पाहून विराटही हैराण, गाडीच्या काचा फोडल्या अन्…; पाहा व्हिडीओ
‘बिग बॉस’ फेम ‘या’ अभिनेत्रीनं कौटुंबिक वादातून केला आत्महत्येचा प्रयत्न
तरुणावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला! हलक्या काळजाच्या लोकांनी…