Top news महाराष्ट्र मुंबई

निलेश राणे-रोहित पवार वादात जयंत पाटलांची उडी; रोहित पवारांना दिला हा सल्ला

मुंबई |  आमदार रोहित पवार आणि भाजप नेते निलेश राणे यांच्या वादात आता मंत्री जयंत पाटील यांनी उडी घेतली आहे. जयंत पाटील यांनी रोहित पवार यांना समजूतदारपणाने सल्ला दिला आहे. एखाद्याची पातळी फार खालची असते. त्या पातळीपर्यंत आपण जायचं नसतं, असा सल्ला जयंत पाटील यांनी रोहित पवार यांना दिला आहे.

‘आपली पातळी किती खाली न्यायाची? एखाद्याची पातळी फार खालची असते. त्या पातळीपर्यंत आपण जायचं नसतं. काही वेळाने अशा लोकांचा नादच सोडून द्यायचा. आपण एका मर्यादेपर्यंत कुणाच्या तोंडाला लागायचं हे ठरवायचं असतं. एका मर्यादेनंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. काही लोक घरी बसून वेगवेगळ्या वल्गना करत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. रोहित पवार दुर्लक्ष करतील, असा मला विश्वास आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

गल्लीतलं शेंबडं पोर लहान लहान गोष्टीसाठी कसं किर किर करत असतं… तसं एक शेंबडं माझ्या आजोबांच्या पत्रावर कोणी बोलू नका म्हणून किर किर करतंय… ह्या वांग्याची लायकी काय आमच्या नेत्यांवर बोलायची? कोपर्डीची घटना, मराठा क्रांती मोर्चे झाले पण हा लुक्का तेव्हा काही बोलला नाही, अशी जहरी टीका निलेश राणेंनी रोहित यांच्यावर केली होती.

कोरोनाच्या या कठीण काळात शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. तसंच साखर उद्योग देखील अडचणीत आला आहे. या दोन्ही विषयांवर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविस्तर पत्रं लिहिली. देवेंद्र फडणवीसांनी यावरून पवारांवर टीका केली होती. यानंतर रोहित पवार यांनी फडणवीसांना चांगलंच सुनावलं होतं. यानंतर निलेश राणे फडणवीसांच्या मदतीला धावून आले. आमच्या नेत्यांवर बोलण्याची तुझी लायकी आहे का? अशी टीका त्यांनी रोहित यांच्यावर केली आहे.

निलेश राणे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. त्यावेळी तनपुरे यांच्या मदतीला रोहित पवार धावून आले होते. त्यांनी निलेश राणेंना खडसावलं होतं. आपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो, असं रोहित पवार म्हणाले होते.

रोहित पवार तनपुरे यांच्या मदतीला धावून गेल्यावर निलेश यांनी रोहित आणि प्राजक्त तनपुरे या दोघांवर देखील निशाणा साधला होता. बोलणाऱ्याची लायकी बघून उत्तर देतो मी. धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुझ काम माहीत आहे मला, बोलत राहिलास तर त्याचं पण ट्रेलर देईन मग लोकंच चप्पलेच्या प्रदर्शनात बसवतील तूला, असं प्रत्युत्तर त्यांनी रोहित पवारांना दिलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-सर्व धार्मिक स्थळांचा पैसा गरिबांसाठी वापरावा; प्रकाश आंबेडकर यांची मागणी

-पुण्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले? किती रुग्णांना मिळाला डिस्चार्ज???

-घरच्या अंगणाला रणांगण बनवणं याला शहाणपण म्हणत नाही; अजितदादा भडकले

-कोरोना परिस्थितीबाबत राज्यपालांनी बोलावली होती बैठक; मुख्यमंत्री जाणार नाहीत!

-…तर मुख्यमंत्री महोदय चुकीला माफी नाही; भाजपचा इशारा