“मला छाती फाडून शरद पवार दाखवायचे नाहीत”

पुणे |  जे सोडून गेले ते गेले. त्यांना जाऊ द्या. आता त्यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही. पण इतिहासात आयत्यावेळी मला कुणी पवार साहेबांची साथ सोडली, असं कुणी म्हणणार नाही. पक्षाने नेत्यांना तयार केलेलं असतं. नेत्यांनी पक्षाला नव्हे. मी पवार साहेबांच्या विचारधारेवर प्रेम करतो. मला जटायू व्हायचंय… हनुमान नाही! आणि माझी छाती फाडून मला शरद पवार साहेब माझ्या हृदयात आहेत, असं दाखवायचं नाही, असं राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज उद्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जातीये. याच पार्श्वभूमीवर ‘बीबीसी मराठी’च्या आयोजित कार्यक्रमात आव्हाड बोलत होते. मराठवाड्यात शरद पवारांचं स्वागत करण्यासाठी तरूणाई रस्त्यावर उतरलीये, हीच परिवर्तनाची चाहूल आहे, असंही आव्हाड म्हणाले.

2014 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ऐतिहासिक चूक होती, असा पुनरूच्चार आव्हाडांनी यावेळी केला.

कधीही विचारधारेशी तडजोड करता कामा नाही. विचारधारेशी तडजोड कराल तर आपण संपू, अशी भिती आव्हाडांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, सरकारवर टीका करताना 1970 पासून काही लोकं राममंदिरासाठी विटा गोळा करतात. मात्र ते आणखीही राम मंदिर बांधू शकले नाहीत. त्यांचं असंच आहे.. ‘मंदिर वही बनाऐंगे मगर तारीख नही बतायेंगा’, असा टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या-