सरकारकडून अपेक्षा राहिली नाही; मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. किरण कृष्णा कोलते-पाटील असं या तरुणाचं नाव आहे. तो जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी येथील रहिवासी होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी झालेल्या आंदोलनांमध्ये तो सहभागी झाला होता. सरकारकडून अपेक्षभंग होत असल्याची भावना निर्माण झाल्याने त्याने गावातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.

मी आत्महत्या करतो; फोन करुन दिली माहिती-

किरणने आत्महत्या करण्याआधी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी संजय जऱ्हाड यांना फोन केला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे मी आत्महत्या करतोय, असं त्याने संजय जऱ्हाड यांना सांगितलं होतं. संजय जऱ्हाड यांनी यावेळी किरणची समजूत काढली होती. तू जीव दिला तर आरक्षणाचा फायदा कुणाला?, असा सवाल त्यांनी किरणला विचारला होता. मात्र फोन कट करुन किरणने गावातील एका विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली.

किरणने संध्याकाळी साडेसात वाजता मला फोन केला होता. मी त्याची समजूत काढली होती. तो इतका टोकाचा निर्णय घेईल वाटलं नव्हतं. मला धक्का बसला आहे. शासनाने किरणच्या कुटुंबाला मदत द्यावी- संजय जऱ्हाड, मराठा मोर्चा समन्वयक

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी-

प्रिय दादा व तात्या,

मी या जगाचा निरोप घेत आहे. मी नोकरीसाठी खूप प्रयत्न केले पण यश येईना. शेतीसुद्धा पिकेना. मला अपेक्षा राहिली नाहीये. स्कोडा कंपनीत मुलाखत होऊनसुद्धा काम झाले नाही. मराठा आरक्षणासाठी मोर्चात सहभागी झालो. मला सरकारकडून अपेक्षा राहिली नाही. मला भविष्य नाही. आपली परिस्थितीसुद्धा एवढी चांगली नाही की मी व्यवसाय करावा. पैसे नसताना सुद्धा तुम्ही मला खूप शिकवले. आता तुम्हाला माझा त्रास होणार नाही. माझे ओझे होणार नाही. बाबाला आणि आईला जीव लावा.

10 लाखांची मदत आणि नोकरीची मागणी-

ग्रामीण रुग्णालयात किरणचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मृतदेह घेऊन तहसीलदार कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. किरणच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत द्या तसेच कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीत घ्या, अशी मागणी करण्यात आली. तसा प्रस्ताव शासनाला पाठवण्याचे आश्वासन तहसीलदार छाया पवार यांनी दिलं. त्यानंतर किरणच्या मृतदेहावर अंत्यसंकार करण्यात आले.