मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभेत भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली होती. खासदार किरीट सोमय्या यांनी राज ठाकरेंच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरे माझे मित्र आहेत. आताही कधी कधी आम्ही बोलतो. पण आता राज ठाकरेंच्या पक्षाची उंची जमिनीबरोबर झाली आहे. मलासुद्धा त्याचं वाईट वाटतं, असं किरीट सोमय्या म्हणाले.
पक्षाची उंची वाढवण्यासाठी आता त्यांची केविलवाणी धडपड सुरु आहे. राज ठाकरेंनी गेल्या 5 वर्षात किती वेळा रेल्वेचे प्रश्न मांडले. अरे जरा माहिती घ्या. किरीट सोमय्याने फक्त फलाटांची उंची मोजली नाही तर उंची वाढवली. 425 प्लॅटफॉर्मची उंची वाढवलीय, असं त्यांनी सांगितलं.
मोनिका मोरेच्या नावाचा राज ठाकरे राजकारणासाठी वापर करत आहेत. हे अत्यंत घृणास्पद आहे. देव त्यांना सदबुद्धी देवो, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
सत्तेत येण्याआधी किरीट सोमय्या ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. मात्र आता याच ईव्हीएमच्या प्रश्नावर किरीट सोमय्या गप्प असल्याने याच मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी सोमय्यांवर टीका केली होती. राज यांच्या या टीकेलाही सोमय्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
पराभव दिसत असल्याने विरोधकांकडून त्याचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचं काम सुरु आहे. होय मी 2009 मध्ये ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तेव्हा अनेक पक्ष माझ्या सोबत होते. निवडणूक आयोगाने यामध्ये लक्ष घातलं. आताची व्हीव्हीपॅट सारखी पारदर्शक पद्धत त्यामुळेच आली आहे. मोदी सरकारने सत्तेवर येताच यासाठी मोठा खर्च केला- किरीट सोमय्या
दरम्यान, भाजप आणि शिवसेनेचं बिनसलं त्या काळात किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविरोधात रोष होता. लोकसभा निवडणुकीत युती झाली, मात्र त्याचा सर्वात मोठा फटका किरीट सोमय्या यांना बसला.
शिवसेनेच्या दबावामुळे भाजपने किरीट सोमय्या यांना तिकीट दिलं नाही. त्यांच्या ऐवजी भाजपने नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. आधीच किरीट सोमय्या शिवसैनिकांच्या निशाण्यावर आहेत. त्यातच आता त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे, त्यामुळे आगामी काळात मनसेसोबत त्यांचे खटके उडण्याची शक्यता आहे.