महाराष्ट्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग

कोकणात भाजपचे निरंजन डावखरे विजयी; शिवसेना-राष्ट्रवादी चीतपट

मुंबई : कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. शिवसेनेचे संजय मोरे आणि राष्ट्रवादीचे नाजीब मुल्ला यांचा निरंजन डावखरे यांनी पराभव केला. तब्बल 8 हजार 127 मतांनी त्यांनी विजय मिळवला. 

ऐनवेळी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी-

ऐन निवडणुकीच्या तोंडावर निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. जिल्ह्यातील राजकारणात आपल्यावर कुरघोडी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. वरिष्ठांना वेळोवेळी या गोष्टीची कल्पना देऊनही काही उपयोग झाला नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. भाजपमध्ये प्रवेश करतानाच भाजपने त्यांना कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. 

शिवसेना-राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला-

ऐनवेळी निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी सोडल्यानं राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे विश्वासू नजीब मुल्ला यांना राष्ट्रवादीकडून तिकीट देण्यात आलं होतं. दुसरीकडे शिवसेनेने संजय मोरे यांना उमेदवारी देत चुरस निर्माण केली होती. आदित्य ठाकरे स्वतः लक्ष घालणार असल्यामुळे शिवसेनेचं वजन या मतदारसंघात वाढलं होतं. 

निरंजन डावखरे यांचा जनसंपर्क आणि आपली ताकद वापरत भाजपनं हा डाव खरा ठरवला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला चीतपट करत भाजपने राष्ट्रवादीची ही जागा आपल्याकडे खेचली.

तब्बल 23 तासांनी लागला निकाल-

दरम्यान, मतपत्रिकांमधील घोळ आणि उमेदवारांकडून सातत्याने घेतले जाणारे आक्षेप यामुळे मतमोजणीला मोठा वेळ लागला. तब्बल 23 तासांनी हा निकाल लागला. 

IMPIMP