लालबागच्या राजाच्या ‘त्या’ कार्यकर्त्यांना सुट्टी नाही, अशी होणार कारवाई!

लालबागच्या राजाच्या मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार आहे. पोलिसांनी धक्काबुक्की केल्या प्रकरणी ही कारवाई होणार आहे. याप्रकरणी आदेश देखील देण्यात आलेले आहेत. गणेश विसर्जन पार पडल्यानंतर या मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार आहे. पोलिसांनी या प्रकरणी आदेश जारी केल्याचं कळतंय. पोलिसांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतलं आहे. हे फुटेज पाहण्याचं काम सध्या सुरु आहे. फुटेजमध्ये असलेल्या मुजोर कार्यकर्त्यांना अटक होणार आहे. 

नेमका काय घडला होता प्रकार?

18 सप्टेंबर रोजी मंगळवार होता. मंगळवार हा गणपतीचा वार मानला जातो. त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. रोजपेक्षा जास्त गर्दी झाल्यामुळे गोंधळ उडाला होता. या गोंधळात लालबागच्या राजाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. खजिनदार मंगेश दळवी यांना पोलिसांचा धक्का लागला त्यामुळे हा वाद पेटल्याचं बोललं जातंय. यावेळी डीसीपी अविनाश कुमार याठिकाणी उपस्थित होते. त्यांनाही लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. 

लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी जुनीच?

पोलिसांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांविरोधात एकच संताप व्यक्त करण्यात आला होता. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांच्या मुजोरीची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांच्या मुजोरीचा प्रत्यय सर्वसामान्य भक्त तसेच महिलांना आला आहे. त्यावरुन लालबागच्या राजाला टीकेचा सामना देखील करावा लागला आहे. 

नेमकी कशी होणार कारवाई?

पोलिसांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार पोलीस आणि सरकारने गांभीर्याने घेतल्याचं कळतंय. पोलिसांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज घेऊऩ ठेवलं आहे. हे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आहे. पोलिसांसोबत मुजोरी करणाऱ्या लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांची नावं काढली जात आहेत. गणेशोत्सवाला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी आस्ते कदम घेतले आहे. गणेश विसर्जन संपल्यानंतर या मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.