मुंबई | गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला.
कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती.
30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशभरात शोककळा पसरली आहे. मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांच्या निधनानं आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली आहे जी भरली जाऊ शकत नाही, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
येणाऱ्या पिढ्या त्याचं भारतीय संस्कृतीतील एक मोठं नाव म्हणून स्मरण ठेवतील, लतादीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती, असंही ते म्हणाले.
दरम्यान, मुंबईतील पेडर रोड भागात असलेल्या लता मंगेशकर यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी दुपारी 12.30 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
महत्वाच्या बातम्या-
पाचव्या वर्षापासून गायनाची सुरुवात; लता मंगेशकरांचा सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम
गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन, देशावर शोककळा
अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; मराठी चित्रपटासाठी गायलेलं गाणं लवकरच येणार