Gudi Padwa 2022 | गुढीपाडव्याची पूजा विधी, मुहूर्त आणि महत्व, जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई | गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) हा चैत्र महिन्यात येणारा एक महत्त्वाचा सण आहे. या सणापासून मराठी आणि कोंकणी लोकांच्या नवीन वर्षाला सुरुवात होते. हा सण महाराष्ट्र आणि गोव्यात शुक्ल पक्षाच्या चैत्र प्रतिपदा तिथीला हिंदू कॅलेंडरनुसार साजरा केला जातो.

भगवान ब्रह्मा (Bramha) आणि विष्णूची पूजा केली जाते. हिंदू धर्मात असं मानलं जातं की चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. विशेषकरुन महाराष्ट्रात हिंदू नववर्ष हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो.

हा सण देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. कोंकणी लोक याला संवत्सर म्हणतात. कर्नाटकमध्ये हा सण युगाडी पर्व या नावाने ओळखला जातो, तर आंध्रप्रदेश, तेलंगाणामध्ये हा दिवस उगाडी, काश्मीरमध्ये ‘नवरेह’, मणिपूरमध्ये सजिबू नोंगमा पानबा या नावानं ओळखला जातो.

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. गुढीपाडव्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेऊ या.

पौराणिक कथेनुसार, प्रभू श्रीराम या दिवशी रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले. गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. असं मानलं जातं, की घरामध्ये गुढी उभारल्याने वाईट शक्ती दूर राहतात आणि घरात सुख-समृद्धी येते. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व जण आपल्या घराची विशेष साफसफाई करतात आणि सजावट करून घरातलं वातावरण प्रसन्न आणि शुद्ध बनवतात. गुढीपाडव्यापासून चैत्री नवरात्राची सुरुवात होते.

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पानं खाऊन दिवसाची सुरुवात केली जाते. असं म्हटलं जातं, की यामुळे रक्त शुद्ध होतं आणि शरीर मजबूत होतं. गुढीपाडव्याला आंब्याच्या पानांचं तोरण घराच्या दारावर लावलं जातं. त्यानंतर घराबाहेर सुंदर गुढी उभारली जाते. गुढीसमोर आणि दारासमोर आकर्षक रांगोळी काढली जाते. गुढीची मनोभावे पूजा करून सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

गुढीपाडव्यानिमित्त घरात पुरणपोळी, बासुंदी, श्रीखंड, मसालेभात, आमरस, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, चटण्या, गुलाबजाम, कोथिंबीरवाडी अशा वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते. या दिवशी घरातली सर्व मंडळी आवर्जून एकत्र जेवणाचा आस्वाद घेतात.

या दिवशी घरात धनधान्य आणलं जातं. नवीन पिकाची पूजा केली जाते. तसंच सोनं, वाहन किंवा घर यांची खरेदी केली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतंही काम सुरू करणं शुभ मानलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या-

Corona: राज्याच्या कोरोना आकडेवारीत मोठी घट, वाचा आजची ताजी आकडेवारी 

मोठी बातमी: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजप नेत्याचा कार्यक्रम होणार?

Anil Parab: “आता पुढचा नंबर अनिल परबांचा, त्यांनी लवकर बॅग भरावी”

Russia-Ukraine War: युद्धात मोठी घडामोड; ‘या’ शहरातून रशियन सैन्य अचानक माघारी फिरलं

“राष्ट्रवादीवर भरोसा ठेऊ नका, मातोश्रीवर कॅमेरे लागतील…”