कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगलीत येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने येत्या दोन दिवसांत या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये धाकधूक वाढली आहे. नुकत्याच दोन दिवसांपासून पावसाने जरा विश्रांती घेतली होती. अनेक भांगामधील पुराचं पाणीही ओसरण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येईल असं वाटत होतं.

सांगली आणि कोल्हापुरातील अनेक भागांमधील साचलेलं पाणी ओसरु लागल्याने पुढील कार्याला वेग आला होता. लोकं आपल्या घरी परतू लागली होती. परिसरातील कचरा काढून परिसर स्वच्छ केला जात होता. आरोग्याच्या दृष्टीने पावलं उचलली जात होती.

पूरग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेकडे प्रशासनाची वाटचाल सुरु झाली होती. मात्र, आता पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली त्यामुळे पूरग्रस्तांची चिंता वाढली आहे.

सांगलीत पुन्हा मुसळधार पाऊस झाला, तर जी गावं पाण्याखाली आहेत त्यांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सांगलीतील सुखवाडी, ब्रम्हनाळ, आमणापूर यांसारख्या गावांमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी साचलेलं आहे.

शेकडो घरं अजूनही पाण्याखाली आहेत. त्यामुळे पुन्हा पाऊस झाल्यास धोका दुप्पट होणार. ज्या चार भिंती शिल्लक आहेत, कदाचित त्याही उरणार नाहीत.

दरम्यान, सांगलीत पावसाने विश्रांती घेतल्याने बचावकार्याला वेग आला होता. जर पुन्हा पाऊस सुरु झाला तर बचावकार्यात मोठा अडथळा येऊ शकतो. 

महत्वाच्या बातम्या-

-अमित शहा स्वातंत्र्यदिनी जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी जाणार?

-तक्रार करणाऱ्या पूरग्रस्ताला चंद्रकांत पाटलांची दमदाटी

-पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रितेश देशमुखने केली 25 लाखांची मदत

-अकोट विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेेदवारीसाठी भाजपकडून कँम्पेन

-“माझे अनेक मित्र पाकिस्तानी आहेत पण मी देशभक्त आहे”