महाराष्ट्रातील किल्ल्यांवर उभारण्यात येणार हेरिटेज हॉटेल्स; गडप्रेमींकडून संताप

मुंबई | महाराष्ट्रातील 25 ऐतिहासिक किल्ल्याचं हेरिटेज हॉटेल किंवा विवाह स्थळांमध्ये रुपांतर करण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातला आहे. ‘हेरिटेज टुरिझम’ला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसी ने 25 किल्ल्यांची निवड केलेली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलेल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचं जतन होण्याऐवजी त्यांचं हॉटेलमध्ये रुपांतर करणं दुर्दैवी असल्याचा सूर सर्वसामान्यांमधून उमटत आहे. राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांनीही ट्विटरवरुन चिड व्यक्त केली आहे.

स्थानिक पर्यटकांमध्ये हेरिटेज टुरिझम अर्थात गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तू यांच्या पर्यटनाची टूम आहे. पर्यटन क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी किल्ल्यांचं रुपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे.

महाराष्ट्रातील गड किल्ले हेरिटेज हॉटेलियर्स आणि हॉस्पिटॅलिटी चेन्सना भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

किल्ल्यांना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाबाबत राज्य मंत्रिमंडळाने तीन सप्टेंबर रोजी निर्णय घेतला होता. संरक्षित स्मारकांच्या यादीमध्ये नसलेले आणि सरकारी जमिनीवर नसलेले राज्याच्या मालकीचे किल्ले भाड्याने देण्यास हे नवीन धोरण एमटीडीसीला अनुमती देते.

निवासी हॉटेल्सव्यतिरिक्त विवाहसोहळे आणि करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किल्ले रुपांतरित करण्याची योजना असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.