नक्की काय आहे सरकारचा घरपोच दारु देण्याचा निर्णय?

मुंबई | राज्य सरकार नागरिकांना लवकरच घरपोच दारु देण्याच्या योजनेचा विचार करत आहे. महसूल राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्य सरकारने जर हा निर्णय घेतला तर अशा प्रकारची अजब योजना करणारं महाराष्ट्र देशातील पहिलंच राज्य ठरु शकतं.

नक्की काय आहे कल्पना?-

सध्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून नागरिक जसे ऑनलाईन शॉपिंग करतात, तशीच शॉपिंग नागरिकांना दारुची करता येणार आहे. यामुळे नागरिकांना थेट दारुची होम डिलीवरी होऊ शकणार आहे. ग्राहकांनी घरी बसून दारुची ऑर्डर द्यायची. ऑनलाईन दारु पुरवणाऱ्या कंपन्या ती ग्राहकाला थेट घरी आणून देतील. त्यानंतर ग्राहक घरबसल्या त्या दारुचा आस्वाद घेऊ शकतो. 

ऑनलाईन दारुविक्रीसाठी सरकार का प्रयत्न करतंय?

ड्रंक अँड ड्राईव्हमुळे रोजच अपघात घडत असतात. लोक बारमध्ये किंवा ढाब्यांवर दारु प्यायला बसतात आणि त्यानंतर घरी जाताना अनेकदा अपघात होतात. ड्रंक अँड ड्राईव्हसाठी कडक कायदा करण्यात आला. मात्र दारुड्यांवर या कायद्याचा फरक पडला नाही. ड्रंक अँड ड्राईवमुळे होणाऱ्या अपघातात रोज अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. ऑनलाईन दारु घरपोच पुरवणे हा राज्य सरकार यावरचा उतारा वाटत आहे. 

नेमकी कुणाला मिळणार घरपोच दारु-

घरपोच दारुच्या सुविधेचा कुणी गैरफायदा घेऊ नये यासाठी सरकार काही गोष्टी करत आहे. खात्री केल्याशिवाय कुणालाही दारु मिळू नये अशी सरकारची भूमिका आहे. वयाचा दाखला तसेच आधार कार्ड घेतल्याशिवाय कुणाला दारु मिळणार नाही, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितली आहे. 

दारुच्या तस्करीलाही बसणार आळा-

दारुच्या बाटलीवर जियो टॅगिंग असेल त्यामुळे ते ट्रॅक करणं जमणार आहे. या गोष्टीमुळे उत्पादकापासून ते ग्राहकाच्या घरापर्यंतचा दारुचा प्रवास समजू शकणार आहे. या फीचरमुळे तस्करी आणि चुकीच्या दारु विक्रीवर प्रतिबंध लागू शकेल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ही आणखी एक गोष्ट त्यादृष्टीने फायद्याची असणार आहे.