भावाला अटक केली, आता माझ्या वडिलांनाही अटक करा; भाग्यश्रीची मागणी

बीड : सुमित वाघमारे हत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती. बहिणीनं प्रेमविवाह केल्यानं तिच्या नवऱ्याची हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणातील पीडितेनं नवी मागणी केली आहे. आपल्या नवऱ्याच्या हत्येप्रकरणी आपले वडील शेषकुमार लांडगे यांना अटक करा, अशी मागणी भाग्यश्री लांडगेनं केली आहे.  माझ्या नवऱ्याच्या हत्या प्रकरणात माझे वडीलही तितकेच दोषी आहेत. त्यांनाही लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी भाग्यश्रीनं केली आहे.  सुमितला लग्नाआधी मारहाण झाली होती. साडेतीन वर्षे वडिलांनी आम्हाला त्रास दिला. जे झालं त्यात माझ्या वडिलांचा सहभाग आहे, असा भाग्यश्रीचा आरोप आहे.

नेमका काय आहे हा प्रकार?

बीडच्या आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या भाग्यश्री लांडगे आणि सुमीत वाघमारे यांची घट्ट मैत्री होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोबत जगण्याच्या आणि सोबतच मरण्याच्या आणाभाका त्यांनी घेतल्या. भाग्यश्रीच्या घरच्यांना मात्र हे लग्न मान्य नव्हतं. त्यांनी या लग्नाला विरोध केला. मात्र भाग्यश्रीने त्यांच्या विरोधाला जुमानलं नाही. तिनं त्यांचा विरोध मोडून काढला. दीड महिन्यांपूर्वी सुमित आणि भाग्यश्रीने कोर्ट मॅरेज केलं. माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे एक रुम भाड्याने घेऊन दोघेही राहत होते.

भाऊच काळ बनून आला-

लग्न केल्यापासून भाग्यश्रीच्या घरच्यांच्या डोक्यात संताप होता. दोन महिन्यांपासून या प्रेमी जोडप्याचा शोध सुरु होता. मात्र भाग्यश्रीचा भाऊच सुमीतसाठी काळ बनून आला.  सुमित आणि भाग्यश्रीची परीक्षा होती. पेपर संपवून ते संध्याकाळी पाच वाजता आदित्य महाविद्यालयाच्या बाहेर पडले. मात्र तिथेच भाग्यश्रीचा भाऊ आणि त्याचे दोन मित्र बसले होते. भाग्यश्री आणि सुमीत दोघांनाही याची पुसटशी कल्पना नव्हती. महाविद्यालयाच्या बाहेरच भाग्यश्री आणि सुमीतवर अचानक हल्ला चढवण्यात आला. हल्ल्यात सुमीत गंभीर जखमी झाला. सुमीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना भा्ग्यश्रीने टाहो फोडला. हल्लेखोर असलेला तिचाच भाऊ आपल्या साथीदारांसह तिथून पसार झाला. भाग्यश्री आरडाओरड करत होती. उपस्थितांना आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी गयावया करत होती. मात्र तिथे उपस्थित असलेल्या एकाच्याही काळजाला पाझर फुटला नाही. ती आक्रोश करत राहिली.

सुमीतला वाचवण्यासाठी रिक्षाचालक सरसावला-

भाग्यश्री जीवाच्या आकांताने नवऱ्याला वाचवण्यासाठी ओरडत होती. एका रिक्षाचालकाने पुढे होत सुमीतला रिक्षात टाकून बीड जिल्हा रुग्णालयात नेलं. रिक्षाचालकाने प्रयत्न अपुरे पडले. रस्त्यातच सुमीतची प्राणज्योत मालवली होती.

कुणीही मदतीला धावलं नाही-

सुमीत आणि भाग्यश्री परीक्षा संपवून बाहेर पडले होते. परीक्षा असल्यामुळे आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयाबाहेर गर्दी होती. महाविद्यालयाबाहेरच हे हत्याकांड घडलं त्यावेळी तिथं मोठ्या प्रमाणात माणसं होती. मात्र सुमीतवर हल्ला झाला त्यावेळी कुणीही पुढे होऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट महाविद्यालयाच्या सुरक्षारक्षकानं गेट लावल्याचा आरोप सुमीतच्या नातेवाईकांनी केला आहे.

आरोपींना अटक पोलिसांना यश-

सुमित वाघमारे हत्या प्रकरणात बालाजी लांडगे, संकेत वाघ आणि गजानन क्षीरसागर या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अकोला परिसरातून बालाजी लांडगे आणि संकेत वाघ यांना अटक केली आहे तर बीड शहरातून गजानन क्षीरसागर याला अटक केली आहे.