संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट करण्याचा डाव???

संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनादरम्यान स्फोट घडवण्याचा कट होता, अशी धक्कादायक प्राथमिक माहिती चौकशीतून समोर येत आहे. मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठीच हे स्फोट घडवले जाणार होते आणि या स्फोटाद्वारे सरकारला इशारा देण्याचा त्यांचा प्रयत्न होता, अशी माहितीही उघड होत आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. 

महाराष्ट्र एटीएसने गेल्या आठवड्यात नालासोपारा आणि राज्याच्या विविध भागांमध्ये मोठी कारवाई केली होती. 3 संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांना अटक करण्यात आली होती. वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर अशी या तिघांची नावं आहे. पोलिसांना त्यांच्याकडे गावठी बॉम्ब, बॉम्ब बनवण्यासाठी लागणारं साहित्य, जिवंत काडतुसं मिळाली होती.

तिन्ही संशयित हिंदुत्ववादी अतिरेकी मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारा येथे हल्ला करण्याचा कट रचत होते. बॉम्बस्फोट घडवण्याचा त्यांचा डाव होता. मात्र स्फोटांची तीव्रती कमी असणार होती. फक्त गोंधळ निर्माण करणे इतकाच त्यांचा उद्देश होता. मराठा मोर्चाजवळच हा स्फोट घडवून सरकारला इशारा देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. चौकशी दरम्यान एका संशयिताने ही माहिती दिल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं म्हटलंय.

तिन्ही आरोपींमधील सुधन्वा गोंधळेकर हा मराठा आंदोलनावर लक्ष ठेवून होता. मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप तो सहभागी होता. पोलीस आता या आरोपीच्या दाव्यातील तथ्यावर तपास करत आहेत, असंही या वृत्तात म्हटलंय.