औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी घोषणा; लवकरच राज्यव्यापी बैठक होणार!

मराठा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी लवकरच जालना शहरात एक बैठक घेतली जाणार आहे. राजकारणी वगळता सर्व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींना एकाच व्यासपीठावर बोलावण्यात येणार आहे. शनिवारी जालन्यात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.

विद्यार्थी, युवक आणि ज्येष्ठांची जिल्हा समन्वयक समिती अशा तीन स्तरावर समित्यांचे गठन यावेळी करण्यात आले. या समित्यांमार्फत येत्या काळात मराठा समाजाच्या प्रश्नांवर लढा दिला जाणार आहे.

मराठा महासंघाचे नेते अ‍ॅड. शशीकांत पवार, मराठा सेवा संघाचे संस्थापक अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडेकर, राजेश कोंढरे, न्या. पी. बी. सावंत, न्या. बी. जी. कोळसे पाटील, न्या. तांबे, सर्वोच्च न्यायालयाचे विधीज्ञ अ‍ॅड. दिलीप तौर, विनोद पाटील, मानसिंग पवार यांच्यासह मराठा समाजाच्या सर्व सामाजिक नेत्यांना एकत्र आणून पुढील आंदोलनाची दिशा व धोरण ठरविले जाईल, असा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

राज्य सरकारने मराठा समाजासाठी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी साखळी पद्धतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच टप्याटप्यात सर्व तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन केले जाईल.

पश्‍चिम महाराष्ट्राच्या आंदोलनास या बैठकीत पाठींबा दर्शविण्यात आला आहे. त्यांच्या आंदोलनानंतर मराठवाड्यातील हजारो दुचाकी वाहने मुंबईत धडकतील असा निर्धार देखील या बैठकीत करण्यात आला. मराठा आरक्षणाबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली जाईल, असंही निश्‍चित करण्यात आलं.

आंदोलना दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या समाज बांधवांवर मोफत उपचार केल्याबद्दल डॉ. वरकड, डॉ. बागल यांचा तसेच आंदोलनात अटक झालेल्या समन्वयकांना जामीनावर मुक्तता करण्यासाठी विनाशुल्क काम करणारे उच्च न्यायालयातील अ‍ॅड. सुदर्शन सोंळुके, अ‍ॅड. लक्ष्मण उढाण, अ‍ॅड. शैलेश देशमुख, अ‍ॅड. अर्जुन राऊत, अ‍ॅड. विनोद तौर यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी मांडण्यात आला. केरळ पुरग्रस्तांसाठीही यावेळी मदत गोळा करण्यात आली. 

IMPIMP