काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ; प्रदेशाध्यक्षपदी या निष्ठावान नेत्याची वर्णी??

मुंबई |  लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. देशभरात काँग्रेसची वाताहत झाली. कर्नाटक आणि राजस्थानमध्ये तर काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळीला उत आलाय. अशा परिस्थितीत महाराष्ट्र काँग्रेस सावध झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसला महाराष्ट्रात सपाटून मार खावा लागला. त्यामुळेच चव्हाण यांनी जबाबदारी घेत प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने ही जागा रिक्त आहे. त्यांच्याच जागी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची निवड होणार असल्याची माहिती मिळतीये.

बाळासाहेब थोरात यांच्या साथीला नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम आणि बसवराज पाटील यांची कार्याध्यक्षपदी नेमणूक होणार असल्याचंही कळतंय.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपलीये. अशा परिस्थितीत कार्यकर्ते आणि नेते जोरात कामाला लागावेत म्हणून राज्यात खांदेपालट होत असल्याच्या चर्चा आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समिकरणे बदलली आहे. या बदललेल्या समीकरणांचा वेध घेत या नियुक्त्या होणार आहेत.

दरम्यान, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील महाराष्ट्रावर अधिक लक्ष केंद्रित केलंय. येणाऱ्या काळात पक्षाची काय रणनिती असेल, हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल.