आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केली खदखद, मुख्यमंत्री वेळ देत नाहीत!

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार घेऊन पावणे दोन वर्ष उलटली आहेत. उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळ देत नसल्याचे आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केले आहेत. ते काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलत होते. कोरोना सारखे संकट असो, राज्यातील विविध विभागात बोकाळलेला भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना, दुष्काळाचे प्रश्न, या सर्वांवर आम्हाला बोलायचे आहे, आमची मते मांडायची आहेत. तेव्हा कृपया आम्हाला भेट द्या, आमचे म्हणणे ऐकून घ्या, अशी मागणी आमदार बंब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून खासकरून राज्याच्या बांधकाम विभागात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार होत असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, ते खोटे ठरले तर मी आमदार पदाचा राजीनामा देऊन राजकारण सोडून देईन, असे आव्हान देखील बंब यांनी यावेळी दिले. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे विरोधकांना वेळ देत नाही, त्यांना बोलू देत नाही असा आरोप केला जातो. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात देखील भाजपने हा मुद्दा प्रकर्षांने सभागृहात आणि बाहेर देखील मांडला होता.

गंगापूर-खुल्तबाद विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याकडे काही मागण्या केल्या आहेत. राज्य सरकारच्या काही विभागांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असून राज्य डबघाईला चालले असल्याचा आरोप देखील बंब यांनी केला. बंब म्हणाले, राज्यात विकासकामे करायची असतील की मग नैसर्गीक संकट, कोरोना सारख्या महामारीचा सामना करायचा असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आमचे विचार, म्हणणे देखील मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ऐकून घेतले पाहिजे.

राज्यातील आणि मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्याकंडे दीड वर्षात १९ पत्र पाठवले असल्याचं त्यांनी यावेळी म्हंटल आहे. पण त्या पत्रांची पोच देण्यापलीकडे कुठलीच दखल घेतली गेली नाही असा आरोप त्यांनी केला. आम्ही मांडलेले मुद्दे, केलेले आरोप खोटे असतील तर त्याचा खुलासा आपल्याकडून होणे अपेक्षित होते, मात्र तसेही घडले नाही. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली पोखरा सारखी योजना, पाणी टंचाईवर मात करण्यासाठीची जलयुक्त शिवार आणि सर्वात महत्वाची मराठवाडा वाॅटरग्रीड ही योजना देखील या सरकारने बंद केली.

तब्बल ४५ हजार कोटी रुपयांच्या योजनेपैकी फक्त २८५ कोटीची योजना आपण पैठणमधून सुरू करत आहात हे धोकादायक आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पुन्हा आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे ठरेल. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा आपली कुठलीच तयारी नव्हती, राज्य व मराठवाड्यातील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा तातडीने भरण्याची गरज असतांना आपण ते केले नाही.

दुसरी लाट येऊन गेली आणि आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे, तरी देखील ही पद भरली गेलेली नाहीत. कोरोना काळात रुग्णांसाठी केंद्राने व्हेंटिलेटर पाठवले पण त्याचा योग्य वापर करणारे डाॅक्टर, तंत्रज्ञ आपल्याला उपलब्ध करता आले नाही. त्यामुळे शेकडो रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.

राज्यातील सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, शेतकरी, व्यापारी, उद्योगपती हे सगळेच आज त्रस्त आहेत. कोरोनाच्या नावाखाली आपण त्यांना बांधून ठेवल्या सारखे झाले आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाहीये. या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी राज्यातील परिस्थिती समजून घेऊन त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून मला व विरोधी पक्षाच्या सर्वंच आमदारांना वेळ दिला पाहिजे. पंधरा दिवसात एका मंत्र्याला एका विभागासाठी नेमूण त्या भागातील समस्या आपण जाणून घ्याव्यात, अशी मागणी देखील बंब यांनी यावेळी केली.

राज्यात भ्रष्टाचार वाढला असून मराठवाड्याचा संपुर्ण पैसा हा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवण्यात आल्याचा आरोप देखील बंब यांनी केला. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार होत असून अधिकारी निर्ढावले आहेत. पुराव्यानिशी आम्ही या संदर्भात पत्र दिले पण ते त्याचा खुलासा करत नाही, याचा अर्थ आम्ही केलेले आरोप योग्य आहे, असेच मी मानतो.

भ्रष्टाचाराचे आरोप खोटे निघाले तर मी आमदार पदाचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन, असेही बंब म्हणाले. राज्यात शेतकरी, कामगारांच्या हजारो आत्मह त्या आपल्या चुकीच्या धोरणांमुळे भविष्यात होऊ शकतात, हे रोखायचे असेल तर आम्हाला वेळ द्या, आमचे म्हणणे ऐकून घ्या, अशी मागणीही बंब यांनी केली.

पाहा व्हिडीओ-