शिवसेनेला झालाय ‘हा’ रोग; मनसेचं जळजळीत टीकास्त्र

मुंबई |  शिवसेनेने आज शेतकऱ्यांच्या पीकविमा प्रश्नांसाठी इशारा मोर्च्याचं आयोजन केलं होतं. त्यावर मनसेने जळजळीत टीकास्त्र सोडलं आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेला Multiple Personality Disorder नावाचा रोग झाला आहे. शिवसेना कधी विरोधात तर कधी सत्तेत असते, असं देशपांडे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचा आजचा मोर्चा हा शेतकऱ्यांचा नसून शेतकऱ्यांसाठीचा आहे, असं शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार देखील मनसेने घेतला आहे.

शिवसेना-भाजपाचं राजकारण म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आहे, अशी जहरी टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. तर ज्यांनी पैसे द्यायला हवेत त्यांनीच आंदोलनं करायची तर शेतकऱ्यांनी कुणाच्या दारात जायचं? नौटंकी सुरू आहे सगळी, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सत्तेत राहून न्याय देत नाहीत अन् रस्त्यावर उतरून नाटकं करतायेत, अशा शब्दात शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. तर शिवसेना एवढया दिवस काय झोपली होती काय? अन् आता जागी झाली… अशा शब्दात राजू शेट्टी शिवसेनेवर तुटून पडले.

दरम्यान, आमच्यावर टीका करणार्‍यांनी आधी स्वतःच्या रक्तातील भेसळ बघावी, असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी टीकाकारांना दिलं आहे.