मेट्रोला विरोध करणारे बच्चन सरकार बदलल्यावर बदलले का?; मनसेचा सवाल

मुंबई : बॉलिवूड अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोचं कौतूक करत आरेच्या जंगलतोडीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. त्यानंतर मनसेने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. जंगल तोडून घरात झाड लावल्यानं जंगल तयार होत नाही, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी व्यक्त केले.

2010 ला मेट्रोला विरोध करणारे अमिताभ बच्चन नवं सरकार आल्यावर मेट्रोला पाठिंबा देत आहेत. सरकार बदलल्यावर अमिताभ बच्चन यांची भूमिका देखील बदलली का?, असा सवाल अखिल चित्रे यांनी केला आहे.

बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये मेट्रोची उपयुक्तता सांगून त्यांनी मेट्रोचा, प्रदुषणाचा आणि झाडांचाही संबंध जोडला. “प्रदूषणावर उपाय म्हणजे अधिक झाडं लावा. मी आमच्या घराच्या बागेत झाडं लावली आहेत, तुम्ही लावलीत का?” यातून बच्चन यांनी अप्रत्यक्षरित्या मेट्रोच्या कामासाठी आरेतील जंगलतोडीलाच पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे.

बच्चन यांच्या मेट्रो समर्थानाच्या ट्विटला प्रतिक्रिया देत मनसेने तुम्ही देखील आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत तुमच्या विदेशातून मागवलेल्या गाड्यांमधून प्रवास करण्याऐवजी लवकरच मेट्रोतून प्रवास कराल, अशी आम्हाला आशा आहे, असं म्हटलं आहे.

अमिताभ बच्चन यांच्या या भूमिकेनंतर मुंबई मेट्रो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चन यांच ट्विट रिट्विट करत कौतुक केलं आहे. त्यामुळे आरेच्या जंगलतोडीवरुन वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

महत्वाच्या बातम्या-